येडियुराप्पा, श्रीरामुलू यांच्याविरुद्ध खटला चालणार?
कोरोना काळातील घोटाळ्याबाबत निवृत्त न्या. मायकल कुन्हा आयोगाची शिफारस
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोराना काळात झालेल्या घोटाळ्याबाबत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि तत्कालीन आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी निवृत्त न्यायाधीश मायकल कुन्हा आयोगाने शिफारस केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. निवृत्त न्यायाधीशांनी प्रामाणिकपणे अहवाल सादर केला आहे. या अहवालामागे कोणतेही राजकीय द्वेष नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना काळातील घोटाळ्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश मायकल कुन्हा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी सविस्तर याची चौकशी करून 1,500 पानी अहवाल सादर केला आहे. आयोगाने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आणि माजी आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची शिफारस केली आहे. याची मंत्रिमंडळ उपसमिती पाहणी करत आहे, असे गुंडूराव यांनी सांगितले.
कोरोना घोटाळ्याबद्दल वैयक्तिक काहीही नाही. काँग्रेस विरोधी पक्षात असताना आम्ही याबाबत आरोप केले होते. काँग्रेसनेही चौकशी करून सरकारला अहवाल दिला होता. मात्र, त्यांनी नियम बाजूला ठेवून निर्णय घेतला होता. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही हे प्रकरण निवृत्त न्यायाधीश मायकल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे चौकशीसाठी दिले. आता पहिला अहवाल देण्यात आला आहे. लवकरच अंतिम अहवाल देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना घोटाळ्यावर न्यायमूर्ती मायकल कुन्हा यांनी दिलेला अहवाल सरकारने उघडकीस केलेला नाही. तरीही ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. कुन्हा यांनी येडियुराप्पा आणि श्रीरामुलू यांच्याविऊद्ध खटला चालवण्याची शिफारस केल्याची बातमी मी पाहिली आहे. यामागे राजकीय द्वेष असल्याचे भाजप नेत्यांचे वक्तव्य आमच्या लक्षात आले आहे. कोरोना घोटाळा तपास राजकीय हेतूने प्रेरित आहे, असेही मंत्री गुंडूराव म्हणाले.
कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याबाबत सार्वजनिक लोकलेखा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार न्यायाधीश कुन्हा यांच्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाने 1,500 पानांचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाला सरकारच्या पाहणी पातळीवर आहे. कोरोना घोटाळ्याचा तपास हा राजकीय खोडसाळपणा असल्याचे सांगणाऱ्या येडियुराप्पा यांनी कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत पैसे लुटणे योग्य आहे का, याचा आत्मपरीक्षण करायला हवा, असा सवालही दिनेश गुंडूराव यांनी केला.
तपासासाठी विशेष पथक स्थापणार
कोरोनादरम्यान पीपीई किटसह अनेक वस्तू जास्त किमतीत खरेदी केल्या गेल्या आहेत, अशीही माहिती आहे. न्यायाधीश कुन्हा यांच्या अहवालाच्या आधारे तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. सर्व बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. सरकारने दोषींकडून झालेले नुकसान वसूल केले पाहिजे, असे न्यायाधीश कुन्हा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने अहवालात म्हटले आहे. आयोगाच्या अहवालाच्या आधारे आम्ही पुढील तपास करू. अहवालाला हलके घेण्याची गरज नाही. येडियुराप्पा यांनी कायदेशीर लढा द्यावे. पण अचानक राजकीय द्वेष आहे असे म्हणणे योग्य नाही, असेही गुंडूराव यांनी स्पष्ट केले.
मी काहीही चुकीचे केलेले नाही
कोरोनादरम्यान आम्ही कायदेशीर चौकटीत सर्व काही केले आहे. कोणतीही चूक केलेली नाही. काँग्रेसने दुर्भावनापूर्ण हेतूने जुने खोदण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा होणार नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. कोरोना काळात सर्व काही कायद्यानुसार झाले आहे. जुने खोदून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नाही.
-बी. एस. येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री
सरकारकडून आपले भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न
राज्य सरकार आपला भ्रष्टाचार झाकून ठेवण्यासाठी येडियुराप्पा आणि माझ्याविरुद्ध खटला चालवायला देणार आहेत. 2020 मध्ये कलबुर्गीतून कोरोनाचा संसर्ग राज्यभर पसरला होता. तेव्हा मी आरोग्यमंत्री तर येडियुराप्पा मुख्यमंत्री होते. दरम्यान, आम्ही एक टास्क फोर्स स्थापन केली होती. त्यात आम्ही सर्व विचारांवर चर्चा करायचो. मात्र, हे सरकार दररोज भ्रष्टाचार करत आहे. हे झाकण्यासाठी ते आमच्यावर खटला चालवणार आहेत.
-बी. श्रीरामुलू, माजी मंत्री