संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार?
संसदेचे हिवाळी अधिवेशन या आठवड्यात सुरु होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये होणारे हे अधिवेशन अलीकडील काळातील सर्वात छोटे हिवाळी अधिवेशन आहे. पण याचा अर्थ त्यात गरमागरमी होणार नाही असं अजिबात नाही. बिहारमधील भाजप प्रणित रालोआच्या देदीप्यमान विजयामुळे या अधिवेशनाची सुरुवात ही ‘मोदी’ ‘मोदी’ अशा घोषणांनी झाली नाही तरच नवल ठरेल. लोकसभा निवडणुकीतील बहुमत मिळवण्यात भाजपाला अपयश आल्यापासून महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि आता बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांच्या लोकप्रियतेत अजिबात घट झालेली नाही. आमचे नाणे अजूनही खणखणीतच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही तरच नवल.
विरोधी पक्षांना मात्र या साऱ्या निवडणुकांत काहीतरी काळेबेरे झालेले आहे असा दाट संशयच नसून खात्री वाटत आहे म्हणून ‘व्होट चोरी’ ची मोहीम सुरु झालेली आहे. निवडणूक आयोग आणि विशेषत: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कृत्यांनी आयोग हा अभूतपूर्व वादात अडकलेला आहे. त्यात नवीन वर्षात विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये स्पेशिअल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर ) ची प्रक्रिया सुरु करून त्यांनी हा वाद चिघळवलेला आहे. तृणमूल काँग्रेसच्या दहा खासदारांनी ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली तेव्हा एसआयआर बाबत बरेच प्रश्न विचारले पण त्यातील एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर मिळाले नाही. या अधिवेशनात हा मुद्दा वादळ माजवू शकते. सत्ताधाऱ्यांनी आयोग आपल्या खिशात घातलेला आहे अशी टीका/ आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत.
तसे बघितले तर या अधिवेशनात सर्वात आक्रमक राहतील ते तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक कारण बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. ममता बॅनर्जी आणि एम के स्टालिन हे त्यांच्या राज्यांशी केंद्र दूजाभाव करतो आहे अशी तक्रार आहे. यांची त्यांच्या राज्यातील राज्यपालांबाबतीत देखील गाऱ्हाणी आहेत. त्यापाठोपाठ समाजवादी पक्ष देखील सरकारच्या विरोधात प्रकर्षाने आवाज उठवू शकतो. बिहारमधील भाजपच्या जबर विजयाने समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव सावध झालेले आहेत. गेली जवळजवळ 15 वर्षे सत्तेत असलेल्या ममतांना बंगालमधून उखडण्याचा कार्यक्रमाचा दिल्ली आणि आसपासच्या भागातील वाढते प्रदूषण आणि त्याने होत असलेले नागरिकांचे हाल वेशीवर टांगण्याचे काम या अधिवेशनात होऊ शकते. राहुल गांधींनी या साऱ्या प्रकरणावर पंतप्रधान मौन का? असा जाहीर प्रश्न विचारलेला आहे.
अशातच विरोधकांना उचकावून आपले उखळ पांढरे करण्याचा सरकारचा प्रयास या अधिवेशनात देखील दिसणार याची चिन्हे आताच दिसू लागलेली आहेत. राज्यसभा सचिवालयाने एक निर्देशिका काढून सभागृहात अथवा बाहेर ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’ च्या घोषणांना बंदी घालून आगीत तेल ओतलेले आहे. अशा घोषणांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय येतो अशी भूमिका सचिवालयाने घेतलेली आहे. हे अधिवेशन राज्यसभा सभापती या नात्याने नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे पहिले होय. जगदीप धनखड यांच्या सभापतीपदामुळे चिडलेल्या विरोधकांना ते गेल्यावर सभागृहातील कामकाज सुरळीत होईल अशी अपेक्षा होती ती कितपत खरी ठरते ते या अधिवेशनात दिसून येणार आहे.
सरकारचा धूर्तपणा वेळोवेळी दिसून येत आहे. कितीही वाद झाला तरी आपला अजेण्डा राबवण्यात सत्ताधारी यशस्वी ठरताना दिसत आहेत तर वेळोवेळी विरोधक मात्र ‘रिअॅक्टिव्ह मोड’ मध्ये आल्याने आपले म्हणणे ठसठशीतपणे मांडण्यात कमी पडत आहेत. बिहारमध्ये आम आदमी पक्ष वेगळा लढून त्याने इंडिया आघाडीच्या बाहेर पडण्याचे काम केलेले आहे. बिहारसहित विविध राज्य निवडणुकात काँग्रेसला आलेले अपयश ही त्या पक्षात फूट पडण्याची नांदीच आहे काय अशा प्रकारचे भाकीत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच शक्तिपात झालेल्या विरोधकांना अजून दुबळे करण्याचे काम चालवले आहे काय अशी शंका राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे.
विरोधी पक्षांशी चर्चा न करता भाजपने जुने कामगार कायदे मोडीत काढून चार नवीन लेबर कोड अमलात आणलेले आहेत, त्याने एक नवीन वाद उत्पन्न झालेला आहे. देशातील बहुतांश सेंट्रल ट्रेड युनिअन्सनी या नवीन कोडविरुद्ध आवाज उठवला आहे. या नवीन कायद्याद्वारे श्रमिकांना ‘हायर अँड फायर’ करणे सोपे जाणार आहे. 300 पर्यंत कामगार असलेल्या फॅक्टरीला कामगारांना काढण्यास पूर्ण मुभा देण्यात आलेली आहे. सरकारकरता आनंदाची बातमी अशी की मूडीज सारख्या आंतरराष्ट्रीय आर्थिक हालहवाल बघणाऱ्या संस्थेने येत्या काळात आशियामधील इतर राष्ट्रे ही तीन ते चार टक्क्यांनी वाढतील तर भारताचा विकास दर 7 टक्के असेल असे भाकीत केलेले आहे. अलीकडील काळात सेमी कंडक्टर, डाटा सेन्टर्स वगैरे क्षेत्रात खासगी क्षेत्राने मोठी गुंतवणूक करण्याचे जाहीर करून आर्थिक गती वाढणार असे संकेत दिलेले आहेत. असे सारे चित्र असताना इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने भारताच्या आर्थिक प्रगतीचे आकडे फारसे विश्वासार्ह नसतात असे सूचित केलेले आहे.
अधिवेशनाच्या अगोदरच संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत. ‘संसदेच्या कामात व्यत्यय आणण्याची विरोधकांची रणनीती कायम राहिली आहे. त्यांचे एकामागून एक पराभव होत आहेत. अशावेळी ‘फेल’ झालेल्या नेत्यांच्या मागे लागणे कितपत सयुक्तिक याचा विचार झाला पाहिजे’, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी भूमिका वेळोवेळी विविध सरकारांनी घेतलेली आहे.
अमेरिकेतील एप्स्टीन वादाचे सावट या अधिवेशनात पडणार काय? याबाबत उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. एप्स्टीन हा अमेरिकेतील बदनाम असा धनाढ्या व्यक्ती होता. त्याने आपले वजन वाढवण्याकरता अमेरिकेसह जगातील बऱ्याच वजनदार लोकांना एका वादग्रस्त सेक्स रॅकेटमध्ये गुंतवले होते. या व्यक्तीच्या सान्निध्यात तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील आले होते, अशी चर्चा आहे. याबाबतचे आरोप ट्रम्प यांनी धुडकावून लावले असले तरी हा वाद त्यांची पाठ सोडत नाही असे दिसत आहे. आपल्याकडील एक केंद्रीय मंत्री तसेच एक वादग्रस्त उद्योगपती एप्स्टीनच्या संपर्कात होते अशी वृत्ते आहेत. ती कितपत खरी अथवा कसे याची शहानिशा झालेली नाही. एप्स्टीन फाइल्स नजीकच्या काळात जगाच्या समोर येणार आहेत त्यात काही भारतीय नेत्यांची आपत्तीजनक छायाचित्रे अमेरिकन वर्तमानपत्रात छापली जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
अशा नाजूकवेळी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी आणि ज्येष्ठ खासदारांनी एक बैठक भरवून पुढील मार्गक्रमणा कशी करायची याबाबत निर्णय घेणे जरुरीचे आहे, असे भाजपतील असंतुष्ट नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आवाहन केलेले आहे.
बिहारमधील विजयाचा उन्माद एकीकडे दिसत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय जगतात भारताची जास्तच होत असलेली कोंडी देखील समोर येत आहे. एकीकडे पाकिस्तान आणि अमेरिकेची वाढती दोस्ती चिंतेचा विषय बनत असताना दुसरीकडे चीनची अरेरावीदेखील कमी होताना दिसत नाही आहे. अमेरिकेच्या दबावाखाली रशियाकडून आयात होत असलेल्या तेलाची मात्रा भारताने पुष्कळ कमी करूनदेखील अजूनही अमेरिकेबरोबरील व्यापार समझोता झालेला नाही. सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधीपक्ष हा विषय जोरदारपणे उठवतील. दोन्ही सदनातील पीठासीन अधिकाऱ्यांची त्याबाबत काय भूमिका असेल त्यावर विरोधकांना किती वाव मिळेल ते दिसणार आहे. बिहारमधील विजयाने भाजपदेखील आक्रमक स्वरूपात लोकसभा आणि राज्यसभेत दिसणार आहे.
‘कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे’, असेच त्याचे रूप राहिले तर वादळ अटळ आहे.
सुनील गाताडे