कोकणात मतदानाचा टक्का 70 पर्यंत पोहोचणार का?
महाराष्ट्रात पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होते आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात कोकणातील रायगड जिल्ह्यातील सात, रत्नागिरी पाच आणि सिंधुदुर्गातील तीन अशा पंधरा जागांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी नेहमीप्रमाणे विविध उपक्रम राबवलेले आहेत. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने 75 टक्केपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु हे उद्दिष्ट प्रशासनाला गाठता आले नव्हते. तेंव्हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 62.52 टक्के तर रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51 टक्के एवढे मतदान झाले होते.
कधी मतदार यादीत नाव नसल्यामुळे, कधी बाहेरगावी असल्यामुळे, कधी वृद्धत्व तर कधी निव्वळ उदासीनतेमुळे अनेकजण आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत वा बजावू शकत नाहीत. दरम्यान, आज होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावं म्हणून प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. या प्रयत्नांना कितपत यश आलेय, हे आजची मतदानाची आकडेवारी सांगेल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम प्रशासनाकडून गेले महिनाभर राबविण्यात आले. घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभातफेऱ्या, पथनाट्या, सायकल-बाईक रॅली, मॅरेथॉन, समुद्रात मासेमारी नौका रॅली, मतदारांना शपथ, संकल्पपत्र यांसह विविध स्पर्धांच्या माध्यमातून जास्तीत-जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात रत्नागिरीमध्ये समुद्रात जवळपास 100 नौकांच्या सहभागातून काढण्यात आलेली नौका रॅली लक्षवेधी ठरली होती. या रॅलीच्या माध्यमातून मच्छीमार मतदारांना मतदान प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले. 20 रोजी मतदान होणार असल्याने 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 20 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मासेमारी नौका बंद ठेवण्याबाबत मच्छीमारांना आवाहन करण्यात आले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र 2019 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 59.20 टक्के इतके मतदान झाले होते. 2009 व 2014 च्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानात 2019 मध्ये जवळपास 5 टक्के इतकी घसरण झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 63.92 टक्के इतके मतदान झाले होते. तर 2014 मध्ये सिंधुदुर्गात विधानसभा निवडणूक मतदानाची आकडेवारी 68.13 टक्के इतकी होती. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशासनाकडून 75 टक्केपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात 62.52 टक्के इतके मतदान झाले. रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 60.51 टक्के इतकी होती. 2019 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 61.69 टक्के इतके मतदान झाले होते. तर 2019 मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात 61.17 टक्के इतके मतदान झाले होते. एकूणच ही आकडेवारी पाहता कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांवर नेणे ही प्रशासकीय यंत्रणेसाठी एक आव्हानात्मक बाब राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तरी हे उद्दिष्ट साध्य होईल का, हे पहावे लागेल.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांची विभागणी झाल्यानंतर राज्यात प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण पंधरा जागा असून कोकण काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस पहावयास मिळत आहे. येथे एक-एक मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी येथे नियोजन केल्याचे दिसते. नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थायिक असलेल्या मतदारांना मतदानासाठी गावी येण्याचे आवाहन उमेदवारांनी केलेले आहे. त्यासाठी उमेदवारांकडून मुंबई, ठाणे व पश्चिम महाराष्ट्रात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत.
निवडणुकीसाठी केवळ पक्षनेतृत्व किंवा पक्षावरच पूर्णत: विसंबून न राहता उमेदवारांनी सर्वप्रथम जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट पार पाडले आहे. उमेदवारांनी केलेली एकूणच तयारी पाहता यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच एका अर्थाने राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी किती मेहनत घेतात, यावरही मतदानाची आकडेवारी अवलंबून असते हे यातून स्पष्ट होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती होत आहेत. कोकणही त्यास अपवाद नाही. कोकणातील लढती जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ, सावंतवाडी, दापोली आणि गुहागर येथे प्रचारसभा घेतल्या.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे सभा झाल्या. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीदेखील गुहागरात आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतली. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दापोली, देवगड आणि कुडाळ-माणगाव येथे तीन सभा झाल्या. तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चिपळूणातील एका जागेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या उमेदवारासाठी सभा घेऊन वातावरण निर्मिती केलीय. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील महायुतीच्या प्रचारात सामील झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चिपळूणात सभा झाली. प्रचारात राजकीय नेत्यांबरोबरच मराठी अभिनेत्यांनीही हजेरी लावून प्रचारात अधिकच रंगत आणली. एकूणच सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासनाने आपापल्या परीने मतदानासाठी केलेली तयारी पाहता यावेळेस मतदानाचा टक्का वाढण्यास त्याची मदत होणार का, हे पहावे लागेल.
महेंद्र पराडकर