दगड कथा...2
इतके दगड गेले तरी अजून खूप शिल्लक होते.
आता देवाने आपलं काम कमी करण्यासाठी दगडांचे ढीग ढकलून द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काही मोठ्या आकाराचे तर काही लहान आकाराचे दगड होतेच. पण मोठ्या झाडांजवळ आता जागाच नव्हती, हे दगड ठेऊन घ्यायला. आता ते दगड खाली घरंगळून शेतजमिनीवरती हातभर, वितभर वाढलेल्या झाडांवर पडले आणि त्यांच्या बियांना म्हणजे दगडांना त्या झाडावर आलेल्या फुलांनी अलगद आपल्यामध्ये सामावून घेतले. हळूहळू या फुलांच्या भाज्या तयार झाल्या. वांगी, भेंडी, गवार, घेवडा अबब किती ते प्रकार. वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या चवीच्यादेखील. पण काही दगड मात्र जोरात आदळल्यामुळे जमिनीच्या पोटात शिरले. त्याच्यामुळे या दगडांचे झाले कांदे, बटाटे, बीट, सुरण, नवलकोल अशा भाज्या तयार झाल्या. काही दगड मात्र वरून पळत असताना मध्येच कशाला तरी अडकून पडले. त्यांचा पाय कुणीतरी धरला होता. त्यांच्या लक्षातच येईना पण त्यांचे हात मात्र मोकळेच होते. त्यांनी पाय धरल्यामुळे ‘खाली डोकं वर पाय’ अशा स्थितीत हे दगड आता वेलींवरती लोंबकळायला लागले. या वेलींवर वेगवेगळ्या लांबड्या आकाराचे दगडांचे बीज भाजीच्या रूपात आलेले दिसले. कुणाचं झालं पडवळ, कुणाची घोसावळी, कारली, कोणाचे झाले दोडके तर कोणाचे भोपळे, काही लांबडे तर काही गोल ढब्बु आकाराचे. पण शेत जमिनीवर मात्र गंमत झाली. जिथे ह्या बिया पडलेल्या होत्या तिथल्या प्रत्येक पानांमध्ये हे दगड लपले. त्यांनी पानांची दारं घट्ट लावून घेतली आणि वेगवेगळ्या आकारांचे पाच-सहा दगड सात आठ दगड दहा-बारा दगड असे त्या पानांमध्ये पानांच्या दरवाजाच्या आत जाऊन बसले. म्हणजेच त्या प्रत्येक झाडांनी छोटी छोटी एक पिशवी भरून घेतल्यासारखे हे सगळे दगड तयार होते. त्यांच्या झाल्या शेंगा. मूग, मटकीच्या काही मटारच्या, काही वालाच्या तर काही शेवग्याच्या. अशा शेंगांच्या भाज्या तयार झाल्या. लोक आता या सगळ्या भाज्या आवडीने खाऊ लागले आणि त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या बिया बाजूला करून पुन्हा झाड रुजवू लागले. आता दगडांना खूप आनंद झाला. पुन्हा रुजायचं आणि पुन्हा लोकांच्या उपयोगी पडायचं, हा त्यांचा कार्यक्रम कायमचा सुरू झाला. त्यांनी आता देवाचे मनोमन आभार मानले होते.