अमेरिका युक्रेनला ‘टोमाहॉक’ देणार ?
रशियासाठी हा धोक्याचा इशारा : तज्ञांचे म्हणणे
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अनेक प्रयत्न करुनही रशिया-युक्रेन युद्ध थांबत नसल्याने आणि रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत असल्याने अमेरिकेने आता युक्रेनला अधिक शक्तीशाली शस्त्रास्त्रे देण्याचा विचार चालविला आहे. अमेरिका लवकरच युक्रेनमध्ये आपली अतीसामर्थ्यवान ‘टोमाहॉक’ क्षेपणास्त्रे स्थापित करण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री उशीरा युव्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेणार आहेत. ही भेट अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस येथे होत आहे. या भेटीत टोमाहॉक क्षेपणास्त्रांसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्र युक्रेनला मिळाल्यास त्याच्या मारक क्षमतेत मोठी भर पडणार आहे. तसेच रशियातील कित्येक आस्थापने धोक्यात येणार आहेत. या क्षेपणास्त्रांचा पल्ला 2,500 किलोमीटरचा असल्याने ती रशियायच अंतर्भागात मारा करु शकतात. त्यामुळे रशियाची वीजनिर्मिती केंद्रे, अणुप्रकल्प, सरकारी इमारती, सामरिक आस्थापने तसेच विमानतळ आदी धोक्यात येऊ शकतात. ही क्षेपणास्त्रे युव्रेनचे बळ निर्णायकरित्या वाढवू शकतात, असे मत अनेक शस्त्रतज्ञांनी व्यक्त केले आहे.
ट्रंप आणि पुतीन चर्चा होणार
ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत गुरुवारी दूरध्वनीवरुन दोन तास चर्चा केली होती. युद्धावर काय तोडगा निघू शकेल, हा चर्चेचा विषय होता. काही आठवड्यानंतर हंगेरी येथे होणाऱ्या एका परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेते हंगेरीचा दौरा करणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट होणार आहे. ही भेट हे युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टोमाहॉक क्षेपणास्त्रे काय आहेत...
टोमाहॉक ही क्षेपणास्त्रे अमेरिकेने 1970 च्या दशकात विकसीत केली आहेत. ती सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे असून ती दूर अंतरावरुन आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करु शकतात. त्यांची स्फोट क्षमता प्रचंड असल्याने कोणतेही लक्ष्य त्यांच्या माऱ्यासमोर टिकू शकत नाही. या क्षेपणास्त्राचे अनेक प्रकार आहेत. त्यातील भूमीवरुन भूमीवर मारा करण्याचा प्रकार अत्यंत प्रभावी आहे. हीच क्षेपणास्त्रे झेलेन्स्की यांना हवी आहेत. ती अत्यंत महागही आहेत, अशी माहिती आहे.
किती आहेत ही क्षेपणास्त्रे
‘हेरिटेज फाऊंडेशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या नौदलाकडे सध्या 4 हजारहून अधिक टोमाहॉक क्षेपणास्त्रे आहेत. त्यांच्यातील काही हौती दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी उपयोगात आणली गेली आहेत. तथापि, अमेरिका युकेनला 100 ते 200 टोमाहॉक देण्याच्या स्थितीत आहे, अशी माहिती दिली गेली आहे. युद्धाचा रंग पालटण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांची आहे. रशियाकडे या क्षेपणास्त्रांपासून बचाव करणारी यंत्रणा नाही, असे बोलले जाते. त्यामुळे ती युव्रेनला मिळाल्यास रशियावर युद्ध लवकरात लवकर थांबविण्यासाठी दबाव येऊ शकतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियातही या संबंधात गंभीरपणे विचार केला जात असून ट्रंप यांच्याशी पुतीन यांची चर्चा होईल, तेव्हा हा विषयही चर्चेला घेण्यात येण्याची शक्यता अनेक तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.