12 फेब्रुवारीला बांगलादेशात निवडणूक
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशात 12 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही घोषणा त्या देशाच्या अंतरिम प्रशासनाचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी केली आहे. शेख हसीना यांच्या सरकारचे पतन झाल्यानंतर प्रथमच बांगलादेशात निवडणूक घेतली जाणार आहे. पदच्युत शेख हसीना भारतात वास्तव्याला आहेत. या निवडणुकीसंबंधी माहिती बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त नासिरुद्दिन यांनी देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात दिली आहे. 12 फेब्रुवारी 2026 या दिवशी बांगलादेशात मतदान होणार आहे. आम्ही मुक्त आणि निर्भय वातावरणात, तसेच लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक घेऊ शकतो, हे आम्ही जगासमोर या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करणार आहोत.
या निवडणुकीत देशातील सर्व मतदारांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. मतदारांनी कोणत्याही अफवांवर किंवा बनावट वृत्तांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा आणि बनावट वृत्ते या निवडणुकीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरु शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सर्व मतदारांनी सावध असावे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि ‘जुलै निर्धारणा’साठी (जुलै चार्टर) 12 फेब्रुवारी 2026 या एकाच दिवशी साऱ्या देशात मतदान होणार आहे. संसदेच्या एकंदर 300 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अनिवासी बांगलादेशींना या निवडणुकीत भाग घ्यायचा असेल, तर ते 12 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदन पत्र सादर करु शकतात. 29 डिसेंबरला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. 30 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.