महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोवा राज्य कृषिसंपन्न होईल काय?

06:37 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृषी क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्याचा संकल्प गोवा सरकार नेहमी करीत असते. हरितक्रांतीचा विचार मांडत असते. मात्र यात गोवा सरकार, कृषी संचालनालय तसेच गोमंतकीय जनता कितपत यशस्वी होणार, हा संशोधनाचा विषय ठरतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गोव्यातील सावईवेरे येथील हरितक्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे प्रगतीशील शेतकरी संजय अनंत पाटील (वय 58) यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. ओसाड जमिनीत डोंगराळ भागातून भुयाराद्वारे पाणी आणून पाटील यांनी कुळागाराचे नंदनवन बनविले. या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. हा पुरस्कार गोव्यातील शेतकऱ्यांना म्हणा किंवा कृषी क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायक ठरेल व गोवा राज्य कृषिसंपन्नतेकडे निश्चितपणे वाटचाल करेल, ही अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.

Advertisement

यंदाच्या अर्थसंकल्पातही गोवा सरकारने कृषी विभागात वेगवेगळ्या योजना जाहीर करून सरकारने या घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बोअरवेल स्प्रिंकलर्ससाठी दोन कोटींची तजवीज ही चांगली गोष्ट आहे. राज्यात पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय उभारण्याचे आश्वासनही दिले आहे मात्र या योजना केवळ कागदावरच मर्यादित न राहता त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, एवढीच अपेक्षा. मागच्या वर्षी काजू उत्पादकांना जी हमीभाव योजना सुरू केली होती, त्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. सेंद्रीय खताचीही सबसिडी अजून कित्येकांना मिळालेली नाही. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. गोव्याची सद्यस्थिती पाहता नारळ, काजू, सुपारी तसेच अन्य उत्पादनांना कवडीमोल दराने किंमत मिळते.

Advertisement

गोवा राज्यात पायाभूत साधनसुविधा विकसित करण्याच्यादृष्टीने म्हणा किंवा विविध प्रदुषणामुळे म्हणा वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. माडाचे गवत करणारे राजकारणी या गोवा राज्यात आहेत. अशा स्थितीत गोवा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल काय, असा सवाल साहजिकच उपस्थित होत आहे. एकीकडे गोवा सरकार शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे काबाडकष्ट करून शेतीत उतरलेल्या शेतकऱ्यांना रानटी जनावरांचाही उपद्रव सहन करावा लागत आहे. बहुतांश काणकोण, सत्तरी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. अनेक वर्षे यावर ठोस असा तोडगा काढण्यात प्रशासनाला आणि वन खात्याला पूर्णत: यश आलेले नाही. यासारखी दुर्देवी बाब अन्य कोणती नसावी. या भागातील शेतकरी आणि बागायतदार आजतागायत आपला जीव मुठीत धरूनच या परिसरात वावरतो. गवे, रानडुक्कर, माकडे, खेती अक्षरश: उच्छाद मांडतात आणि येथील गरीब शेतकरी हवालदिल होऊन आपल्या फडशा पाडलेल्या पिकाकडे हताश होऊन पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे शेतकरी आणि बागायतदारांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात केरी-सत्तरीत गवारेड्यांनी अक्षरश: धुडगूस घातला. सत्तरी तालुक्यात गवारेड्यांच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या बागायती, शेतीला लक्ष्य केले आहे. या कळपाने शेतीबरोबरच सुपारीची रोपे, केळीची झाडे नष्ट केली आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या अधिवेशनात पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसंबंधी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. यावर आता ठोस प्रतिबंधात्मक उपाय होणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या काळात उच्च शेती, मध्यम उद्योग व कनिष्ठ नोकरी असे चित्र होते परंतु आता उच्च नोकरी, मध्यम उद्योग व कनिष्ठ शेती असे चित्र आहे. आता हलक्या, कष्टकरी कामाकडे गोमंतकीयांचा ओढा कमी होत आहे. गोमंतकीय युवक आज-काल शेतीकडे पाठ फिरवत असून त्यांचा कल पांढरपेशा सरकारी नोकरीकडे आहे. आज गोव्यात शेतजमिनीवर मोठ-मोठ्या इमारती, राहण्यासाठी घरे बांधली जात असल्याने शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जास्तीतजास्त शेती कसली जावी, यासाठी कृषी संचालनालयाने सध्या पावले उचलणे गरजेचे आहे. गोव्यात शेतीविषयक जागृती करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. गोव्यातील काही विद्यालये शिक्षकांसह आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेत बांधावर जणू शाळा भरवित आहेत. शेत नांगरणी, पेरणी यांची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांसाठी करवून घेत आहेत. शेतीविषयी सध्याच्या पिढीमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तसेच कृषी विषयक जागृती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम राबविणे अत्यावश्यक ठरते.

दैनंदिन आहारातील एक प्रमुख घटक म्हणजे पालेभाज्या. राज्याबाहेरील भाज्यांसह आता स्थानिक मळ्यात वा परसूत पिकणाऱ्या गावठी भाज्या राज्यातील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. एका बाजूने राज्याबाहेरून आवक होणाऱ्या भाज्या महाग असल्या तरी या भाज्यांच्या तुलनेत गावठी भाज्यांचे दर परवडणारे असल्याने या भाज्यांना चांगले दिवस आले आहेत. औषधी गुणधर्म आणि पोषकसमृद्ध जीवनसत्त्व असल्याने या भाज्या आरोग्याच्यादृष्टीने उत्तम असतात. त्यामुळे गावठी भाज्यांना बहुतांश ग्राहकांची पसंती आहे. गोवा राज्यात काही ठिकाणी सध्या भाज्यांचे मळे पूर्ण बहरलेले आहेत. गोव्यातील बहुतांश विद्यालयात ‘बाजार डे’ भरविला जातो. या बाजारामध्ये विद्यार्थी गावठी भाज्याही घेऊन बसतात. यामुळे फास्टफूडकडे वळलेला विद्यार्थीवर्गही या उपक्रमामुळे साहजिकच गावठी भाज्यांकडे आकृष्ट होत आहे. या गावठी भाज्या पिकविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने संबंधित यंत्रणेने कार्यरत राहणे आवश्यक ठरते.

आज गोव्यात एकीकडे शेतीबद्दल उदासीनता असताना गोव्याचे प्रगतीशील शेतकरी ‘आधुनिक भगिरथ’ संजय अनंत पाटील यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार लाभला. यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांची तसेच यात उतरू पाहणाऱ्यांची मान नक्कीच उंचावणार आहे. गोव्याच्या शेतकऱ्याची या पुरस्काररुपाने केंद्र सरकारने प्रथमच दखल घेतली आहे व हा पुरस्कार गोव्यातील शेतकऱ्यांचे एक प्रतीक ठरणार आहे आणि त्यातून अनेक शेतकऱ्यांना तथा बागायतदारांना ऊर्जा प्राप्त होणार आहे. कुळागारात काम करणाऱ्याची केंद्र सरकारने कुठेतरी दखल घेतली. यामुळे शेती व्यवसाय हा कमीपणाचा, हलका नसून खरोखरच चांगला आहे, अशी मानसिकता निर्माण होणार आहे. एकंदरित प्रबळ इच्छाशक्ती व बुद्धिमत्तेच्या जोरावर, पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करून हरितक्रांतीचे लक्ष्य साध्य करता येते, असा कृतिशील संदेश संजय पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोमंतकीय शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती घडविणे आवश्यक ठरते.

राजेश परब

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article