रशिया-युक्रेन युद्ध संपणार का?
एनएसए अजित डोवाल यांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट
वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची नुकतीच सेंट पीटर्सबर्ग येथे भेट झाली. या भेटीचा 51 सेकंदांचा व्हिडिओ शुक्रवारी समोर आला. यादरम्यान डोवाल यांनी पुतीन यांना पंतप्रधान मोदींच्या युक्रेन भेटीची माहिती दिली. पंतप्रधान मोदींचा संदेश घेऊन एनएसए डोवाल रशियात पोहोचल्याने युक्रेन आणि रशियादरम्यानचे युद्ध संपवण्यात भारत सक्रीयपणे भूमिका निभावत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थिती संपविण्यासाठी वेगवेगळे गट-तट कार्यरत असले तरी सद्यस्थितीत भारत महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसत आहे. संवादाच्या माध्यमातून हा संघर्ष मिटविण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षमपणे बाजू मांडताना दिसत आहे. आता त्यांनी आपले विश्वासू सहकारी एनएसए अजित डोवाल यांना पुतीन यांच्या भेटीला पाठवून काही महत्त्वाच्या मुद्यांवर प्रत्यक्ष चर्चा घडवून आणली आहे. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्यास नजिकच्या काळात युद्ध संपवण्याबाबत झेलेन्स्की आणि पुतीन यांची प्रत्यक्ष बोलणीही घडवून आणली जाऊ शकतात. पुतीन यांनी अलिकडेच याबाबतचे स्पष्ट संकेत देताना भारत मध्यस्थाची भूमिका निभावू शकतो असा आशावाद व्यक्त केला होता. तसेच आताही पुतीन यांनी मोदींसोबत द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन 22 ऑक्टोबर रोजी कझान (रशिया) येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीची वाट पाहत आहेत. यादरम्यान त्यांनी भारतीय पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय भेटीचा प्रस्तावही ठेवला आहे.
पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना ‘चांगले मित्र’ असे संबोधले आहे. मला मोदींची मॉस्को भेट चांगलीच आठवते. ही भेट केवळ यशस्वी झाली असे नाही, तर त्यादरम्यान घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे होते. आमची महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी वेगाने पुढे जात असून ती खूप महत्त्वाची आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे, असे सुतोवाच पुतीन यांनी केले आहे.
मोदींच्या युक्रेन दौऱ्यानंतर अजित डोवाल रशियात
पंतप्रधान मोदींच्या युव्रेन दौऱ्यानंतर अडीच आठवड्यांनंतर एनएसए डोवाल यांचा रशिया दौरा झाला आहे. 23 ऑगस्ट रोजी युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संभाषणात युव्रेन आणि रशियाने सध्याचे युद्ध संपवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. भारत शांततेसाठी प्रत्येक प्रयत्नात सक्रीय भूमिका बजावण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
डोवाल-शोईगु यांचीही भेट
डोवाल यांनी त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई शोईगु यांच्याशी विस्तृत चर्चा केली आणि परस्पर हिताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली, असे डोवाल आणि शोईगु यांच्यातील चर्चेबाबत रशियातील भारतीय दुतावासाने सांगितले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापासून रशियाने आपल्या सैन्यात भरती झालेल्या 45 भारतीयांची सुटका केली आहे. रशियाने आतापर्यंत एकूण 45 भारतीयांची सुटका केली आहे. रशियन सैन्यात अजूनही सुमारे 50 भारतीय आहेत. यापैकी 10 जणांची पंतप्रधानांच्या भेटीपूर्वीच सुटका करण्यात आली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान मोदींनी रशियन सैन्यात भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला होता.