महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणाचा शेवट क्लीन चिटमध्येच होणार का?

11:37 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजवरच्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यातून जनतेला अनुभव : संशयितांची निर्दोष मुक्तता : दबावाच्या चौकशीची मागणी

Advertisement

बेळगाव : सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दबावाखाली वावरत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तहसीलदार कार्यालयातील अधिकारी रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) याच्या आत्महत्या प्रकरणानंतर सरकारी अधिकाऱ्यांमधील ताणतणाव, अस्तित्वासाठीचा संघर्ष, एकमेकांना संपविण्यासाठी आपल्याच सहकाऱ्यांकडून केले जाणारे षड्यंत्र आदींमुळे अधिकारी तणावाखाली वावरत आहेत, हे लक्षात येते.

Advertisement

गेल्या मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी रुद्रण्णा यडवण्णावर या तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू व अशोक कब्बलगेर या तिघा जणांवर खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसीपी शेखरप्पा एच. व पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदी अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तहसीलदारांच्या कक्षातच झालेल्या या आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. तहसीलदारांसह तिघा जणांच्या त्रासामुळे आपण जीवन संपवित असल्याचा संदेश रुद्रण्णाने ‘तहसीलदार बेळगाव ऑफीस ऑल स्टाफ’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता. मात्र, तहसीलदारांकडून नेमके त्याला कोणत्या प्रकारचा त्रास होता, याचा उलगडा झाला नाही. तहसीलदार कार्यालयातील त्याच्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांची जबानी घेतली जात आहे.

सध्या तहसीलदारांविरुद्ध जबानी देण्यास कोणीच पुढे येत नाहीत. भारतीय न्याय संहितेनुसार आता प्रत्येक प्रकरणात व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येते. त्यामुळे जबानीचेही चित्रीकरण केले जात आहे. खासगीत त्रासाबद्दल बोलणारे अधिकारी प्रत्यक्षात जबानी देताना मात्र तोंड बंद करतात, असा अनुभव तपास अधिकाऱ्यांना आला आहे. तहसीलदारांसह तिघांनी न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांत सुनावणी होणार आहे. कर्नाटकात गेल्या दीड वर्षात सातहून अधिक सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस, महसूल आदी विविध खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ताणतणावामुळे आपले जीवन संपविले आहे. एखादे आत्महत्या प्रकरण घडल्यानंतर त्याला जबाबदार कोण? याविषयी चर्चा होते. त्यांच्यावर कारवाईसाठी आंदोलनही केले जाते. कालांतराने अशी प्रकरणे सारेच विसरतात.

महर्षी वाल्मिकी निगममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्याच निगममधील चंद्रशेखरन पी. या अधिकाऱ्याने शिमोगा येथे 28 मे 2024 रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सहा पानांची चिठ्ठी लिहून भ्रष्टाचार कसा झाला? याची माहिती या अधिकाऱ्याने दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीत मंत्री बी. नागेंद्रना अटक झाली. सध्या ते जामिनावर आहेत. 12 एप्रिल 2022 रोजी बेळगाव येथील संतोष पाटील या कंत्राटदाराने उडुपी येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तत्कालीन ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर त्याने बिले मंजूर करण्यासाठी कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात ईश्वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. चौकशीअंती त्यांना क्लीन चिट मिळाली.

त्रासामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप

अशी प्रकरणे कर्नाटकात याआधीही घडली आहेत. 16 मार्च 2015 रोजी आयएएस अधिकारी डी. के. रवी यांनी बेंगळूर येथील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. राजकीय नेत्यांचा त्रास व बिल्डर लॉबीमुळे या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप झाला. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप झाला होता. शेवटी सीबीआयने डी. के. रवी यांनी आत्महत्या केल्याचे तपासाअंती जाहीर केले. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले. त्यानंतर मंगळूरमधील पोलीस उपअधीक्षक एम. के. गणपती यांनी 7 जुलै 2016 रोजी कोडगू येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली.

तत्कालिन गृहमंत्री के. जे. जॉर्ज व दोघा आयपीएस अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप करीत त्याने आपले जीवन संपविले होते. आत्महत्येपूर्वी त्याने आपला व्हिडिओ बनवला होता. हे प्रकरणही सीबीआयकडे सोपविले. सीबीआय चौकशीत के. जे. जॉर्ज निर्दोष ठरले. सध्या बेळगाव येथे आत्महत्या केलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी भाजपने आंदोलन छेडले आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी प्रकरणाची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविली आहे. केवळ तहसीलदारांच्या जाचामुळेच रुद्रण्णाने आत्महत्या केली आहे की, बदली प्रकरणही कारणीभूत आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. इतर अधिकाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणाचाही शेवट क्लीन चिटमध्ये होणार की रुद्रण्णाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक किमती जमिनीवर भूमाफियांचा डोळा

बेळगावचा झपाट्याने विस्तार होत चालला आहे. त्यामुळे साहजीकच भूमाफियांच्या कारवायाही वाढल्या आहेत. जमिनीचे भाव वाढल्यामुळे सर्वत्र भूमाफिया सक्रिय आहेत. भूमाफिया, पोलीस, महसूल खात्यातील अधिकारी, उपनोंदणी खाते, अनेक राजकीय नेते व त्यांचे पाठीराखे, झटपट नफा देणाऱ्या जमीन व्यवहारात गुंतले आहेत. बेळगाव परिसरातील गोमाळासह अनेक किमती जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. या जमिनी गिळंकृत करण्यासाठी जर एखाद्या अधिकाऱ्याने सहकार्य केले नाही तर त्याचा छळ केला जातो. जमीन व्यवहारात रुद्रण्णावर कोणाचा दबाव होता का? याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article