लोकायुक्तांच्या छाप्यात कोट्यावधींचे घबाड
सह्याद्रीनगर येथील निवासस्थानासह चार ठिकाणी तपासणी : निपाणीतही तलाठ्याच्या घरावर लोकायुक्त धाड
बेळगाव : राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मंगळवारी सकाळी लोकायुक्तांनी छापे टाकले आहेत. बेळगावातही दोघा अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात बेहिशोबी माया उजेडात आली आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीस प्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावात तपासणी करण्यात आली आहे. बेंगळूर येथील व्यावसायिक कर विभागाचे साहाय्यक आयुक्त व्यंकटेश मुजुमदार यांच्या सह्याद्रीनगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. व्यंकटेश सध्या बेळगावात होते. त्यांच्या समक्ष लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सह्याद्रीनगर येथील घरात तपासणी केली. केवळ घरातच नव्हेतर घराभोवतीही तपासणी करण्यात आली. कारण अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या छाप्याच्यावेळी पैसे, दागिने, कपड्यात गुंडाळून खिडकीतून बाहेर टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घराबाहेरही तपासणी करण्यात आली. व्यंकटेश मुजुमदार यांच्या संबंधी बेळगाव, बेंगळूरसह पाच ठिकाणी तपासणी झाली. दोन घरे, एक गॅस गोडावून, एक एकर शेत जमीन, 1 लाख 42 हजार रुपये रोकड, 39 लाख 31 हजार 900 रुपये किमतीचे दागिने, 17 लाख 70 हजार रुपये किमतीची वाहने अशी एकूण 2 कोटी 21 लाख 43 हजार 900 रुपयांचे घबाड उघडकीस आले आहे.
निपाणीत तलाठ्याच्या घरावर लोकायुक्त धाड
निपाणी : निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे कार्यरत असणारे तलाठी विठ्ठल शिवाप्पा ढवळेश्वर यांच्या निपाणीतील भाडोत्री बंगला, मूळ गावी राहते घर, बोरगाव येथील तलाठी कार्यालय यासह एकूण चार ठिकाणी मंगळवारी पहाटे अचानक लोकायुक्तांनी छापा टाकला. यावेळी तपासणीत ढवळेश्वर यांची 1 कोटी 8 लाख 52 हजार 244 रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल ढवळेश्वर हे बोरगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते निपाणी येथील सावंत
कॉलनीत भाडोत्री इमारतीत वास्तव्यास आहेत. दरम्यान मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास अचानक लोकायुक्त खात्याचे अधिकारी चार वाहनातून दाखल झाले. निपाणीसह बोरगावात एकाच वेळेला छापा टाकण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ढवळेश्वर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर तपास मोहीम सुरू होती. लोकायुक्त खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तलाठी विठ्ठल ढवळेश्वर यांच्याकडे एकूण 1 कोटी 50 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये एक राहते घर व चार एकर जमिनीचा समावेश आहे. 8 लाख 2 हजार 244 रुपयांची जंगम मालमत्ता आढळून आली असून यामध्ये 1 लाख 55 लाख 195 रुपये रोख रक्कम,
3 लाख 2 हजार 49 रुपये किमतीचे दागिने आणि 3 लाख 45 हजार रुपये किमतीची वाहने याचा समावेश आहे. विशेष म्हणजे 30 जून रोजी ढवळेश्वर यांच्यावर चिकोडीहून बागलकोटला 1 कोटी 10 लाखाची रक्कम अवैध वाहतूक करताना त्यांना आयकर विभागाने रामदुर्गदरम्यान पकडले होते. त्यानंतर पुन्हा ढवळेश्वर यांच्यावर मंगळवारी लोकायुक्त विभागाने कारवाई केल्याने निपाणीसह बोरगाव परिसरात खळबळ उडाली असून महसूल प्रशासनात काम करण्राया अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोकायुक्त विभागाचे जिल्हाप्रमुख हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी भरत रेड्डी, उपनिरीक्षक रवींद्र धर्मट्टी यांनी 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत चार वाहनातून येऊन निपाणीतील सावंत कॉलनीतील भाडोत्री घरासह बोरगाव येथील तलाठी कार्यालयाचा ताबा घेतला. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी निपाणी येथील भाडोत्री घरातील सर्व कागदपत्राची तपासणी चालवल्याचे दिसून आले. यावेळी पत्रकारांना कोणतीही माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. रात्री दहा वाजेपर्यंत तपासणी मोहीम सुरूच होती. ढवळेश्वर हे गेल्या तीन वर्षापासून निपाणी येथे भाडोत्री घरात राहावयास आहेत. दरम्यान सदर घटनेची बेळगाव येथील लोकायुक्त स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.