अजिंक्यताऱ्यावरील राजसदरेवर दारू पिणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार का? शिवभक्तांकडून संताप व्यक्त
सातारा प्रतिनिधी
सातारा ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी आहे. या राजधानीच्याच राजसदरेवर मानाने माना झुकतात. आजही शिवभक्त कपाळी माती लावून मराठा असल्याचा अभिमान बाळगत पुन्हा नव्याने लढण्याची उर्जा घेतात. अशा उर्जा देणाऱ्या राजसदरेवरच काही मद्यपींनी प्लास्टिकचे ग्लास, दारुची बाटली सोडून खुशाल पेग बनवण्याचा कार्यक्रम सुरु केला. दरम्यान, चुकीचा प्रकार सुरु असल्याची बाब तेथून चाललेल्या एका शिवभक्ताच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या चांडाळ चौकडीस हटकले असता त्यांनीच त्या शिवभक्तावर दादागिरी केली. त्यामुळे किल्ले अजिंक्यताऱ्यावर सुरु असलेल्या अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत असून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे.
राजधानीचे महत्वाचे ठिकाण म्हणून किल्ले अजिंक्यताऱ्यावरील राजसदर मानले जाते. याच राजसदरेचे महत्व सातारा शहरातील काही विघ्नसंतोषी मंडळींना ज्ञात नाही. जे फक्त अयाशी, हुल्लडबाजी आणि छानछोशी आयुष्य जगणारे असतात अशा मंडळींचा अजिंक्यतारा किल्ला, अजिंक्यताऱ्याच्या पायथ्या असलेल्या काही जागा, महादरे परिसरातील झाडी, भैरोबा डोंगराचा पायथा, यवतेश्वर घाटातील झाडीमध्ये, कास धरणच्या परिसरात ही मंडळी दिवसा वा रात्री सुद्धा दारुच्या पार्ट्या करतात. अशीच चांडाळ चौकडी चक्क राजसदरेवर दारुची बाटली, प्लास्टिकचे ग्लास आणि चकना नेवून नवीन वर्ष साजरे करु लागले होते. त्यातल्या काहींना तर पेगची नशा सुद्धा चढली होती. त्यांचा हा अनैतिक प्रकार तेथूनच जाणाऱ्या शिवभक्तांच्या निदर्शनास
येताच त्यांनी त्या चांडाळ चौकडीला हटकले. चांडाळ चौकडीने किमान लाजून कार्यक्रम बंद करणे अपेक्षित होते.उलट त्या शिवभक्तालाच अरेरावीची 'भाषा करु लागले. त्यामुळे वाद नको परंतु त्यांनी तसे न करता म्हणत त्या शिवभक्ताने तेथून निघून जाणे पसंद केले. या प्रकाराबद्दल शिवभक्तांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. काही युवती किल्ला पाहण्यासाठी गडावर जात असतात. गडावर चुकीचे प्रकार होत असतात. अशा काही चांडाळ चौकडीची नजर गडावर फिरायला आलेल्या युवतींवर पडल्यास चुकीचा प्रकार होण्याची 'भीती आहे. त्यामुळे गडावर पोलीस चौकी असणे गरजेचे असून गडावर जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करुनच सोडावे अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.