इलेक्शन ड्युटी करून घरी जाताना तलाठी रोहीतवर काळाचा घाला
सातारा :
ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक बसून तरूण तलाठी रोहीत कदम (वय २८) यांचा अपघाती मृत्यू झाला. विधानसभा मतदान प्रक्रियेचे काम संपवून रात्री अडीच च्या सुमारास भूईज येथे घरी मोटार सायकलवरून रोहीत जात असताना पाचवडजवळ ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसली. अपघातात रोहीत यांना डोक्याला मार बसल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी रोहीत सजा आलेवाडी येथे तलाठी म्हणून रुजू झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी रोहित कदम यांची निवडणुकीच्या कामकाजासाठी आलेवाडी येथे नियुक्ती झाली होती. मतदान प्रक्रियेचे कामकाज झाल्यावर मतपेट्या सातारा येथे जमा केल्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास रोहीत साताऱ्याहून भुईंज येथील घरी जात होते. दरम्यान पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उडतरे-पाचवड येथे उसाने भरलेली ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावले नसल्यामुळे रोहित यांची मोटार सायकल ट्रॉलीला पाठीमागून धडकली. यावेळी रोहित यांच्या डोक्याला मार बसल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाला. ही माहिती घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी भुईंज पोलिसांना दिली.