अंमली पदार्थांच्या सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचेल?
पुणे जिह्यात ठीकठिकाणी छापे टाकून पोलिसांनी साडेचार हजार कोटीहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. अंगावर काटा उभा राहावा अशी ही आकडेवारी आहे. पण, इतक्या छाप्यानंतर तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचणार आहे का? हा प्रश्नच आहे. राज्यातील बिघडत चाललेली युवा पिढी आणि त्यांचा गुन्हेगारी वापर या गंभीर बाबीशी याचा संबंध आहे.
महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ मिळतात हे आता नवीन राहिलेले नाही. सरकारने कितीही तंबाखू विरोधी मोहिमा काढल्या असल्या तरी, वास्तवात ही मोहीम अंमली पदार्थापासून आपल्या राज्यातील बालकांना वाचवण्यासाठी आहे. जवळपास वीस वर्षांपासून ते कार्य चर्चा न करता राज्यात सुरू आहे. पण त्याला यश आलेले नाही. शालेय वयापासून सवय लागलेली काही मुले, महाविद्यालयाच्या परिसरात सहज अंमली पदार्थ मिळवून त्याचा वापर करणारी मुले व खेळाडू, पैशांचे बंडल सहज हाती लागतात अशा घरातील मुले, मुली, महिला, अंमली पदार्थाला चैनी समजणारे सुशिक्षित उच्चशिक्षित वर्ग, व्यापारी, उद्योगपती हा वर्ग एकीकडे आहे.
तर अभावग्रस्त, परिस्थितीमुळे गांजलेला लहान, थोरांचा समूह दुसरीकडे आहे. गुन्हेगारांनी या अभावग्रस्तांना अंमली पदार्थांची चव चाखायला देऊन सवय लावली आहे. त्यांना आपल्या गुन्हेगारी कामासाठी उपयोगात आणून नशेच्या बदल्यात गंभीर गुन्हे घडवण्यासाठी वापरण्याची आणि पैसेवाल्यांना तुटवडा भासवून रक्कम उकळण्याची मोडस वापरली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही अशाच पद्धतीचा वर्ग हा अशा गुह्यांसाठी मुबलक प्रमाणात वापरला जातो आणि खरेदीदार वर्गसुद्धा या वर्गापासून उच्च वर्गापर्यंतचा असतोच असतो.
पुण्याच्या ससून या सरकारी दवाखान्यात राहून ड्रग रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याचे प्रकरण लक्षात घेतले तर त्या प्रकरणात सरकारी दवाखान्यातील स्टाफपासून वरिष्ठ डॉक्टरपर्यंत सगळ्या स्तरातील लोक त्याच्या व्यवसायात मदत करत होते. पोलिस त्याला पकडून घेऊन जाऊ नयेत म्हणून खोटे वैद्यकीय अहवाल देऊन न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचे धाडस करत होते. अखेर एक दिवस त्याच सरकारी दवाखान्यातून बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झाला. या प्रकरणात केवळ डॉक्टरांवर आरोप झाले नाहीत तर त्याला कोणत्यातरी राजकीय शक्तीचे पाठबळ आहे अशा आरोपावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेतेसुद्धा एकमेकांशी झगडले. पुण्यातील प्रकरण नाशिकला पोहोचले.
नवे प्रकरण सांगलीपर्यंत आले. म्हणजे राज्यभर ते पसरले आहेच. पण, ललित पाटील याच्यासारखा किरकोळ माणूस इतक्या सगळ्या यंत्रणेला हाताळत होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरून अशा पद्धतीचे अंमली पदार्थ देशातील बलाढ्या आणि सगळ्या प्रकारच्या यंत्रणांच्या नजरेपासून चुकवून तो सहजपणे पुण्यासारख्या शहरात आणत असावा आणि येथून त्यानेच प्रचंड मोठी वितरणाची साखळी निर्माण केली असावी हे पटत नाही. देश विदेशातील विद्यार्थी जिथे शिकायला येतात आणि किरकोळ माणसांकडून मोठा साठा पकडून जिथे तपास सुरू होतो आणि त्यातून पुढे पुढे पोलिसांच्या हाती घबाड लागते हे लक्षात घेतले तर यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याशिवाय इतके मोठे गुन्हे घडू शकत नाहीत. इथे काही शिक्षण संस्थांच्या परिसरात पुड्या आणि गोळ्या पोहोचवणारी स्थानिक आणि नायजेरियन विद्यार्थ्यांची किरकोळ टोळी नव्हे. इथे जगात मिळणाऱ्या सर्व प्रकारचे अंमली पदार्थ मिळतात, रेव्ह पार्टी होतात, आणि इथूनच सगळीकडे माल पोहोचवला असावा असा तपास अधिकारी संशय व्यक्त करतात. यावरून समुद्र मार्गावरून होणारी वाहतूक, वेगवेगळ्या बंदरावर उतरला जाणारा प्रचंड साठा आणि प्रचंड पैसा असलेल्या भागात त्याचे होणारे वितरण, त्यातून मिळालेला प्रचंड पैसा बिन दिक्कतपणे देशभरात फिरत राहणे आणि देशातील कुठल्याही यंत्रणेला याचा साधा पत्ताही न लागणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एकाच उद्देशासाठीच्या गुह्याचा तपास केवळ छापे टाकले व माल पोहोचवणारे लोक पकडण्यापुरता मर्यादित राहणार का? हा प्रश्न आहे.
बुधवारी पुणे पोलिसांच्या माहितीवरून सांगलीमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि एका छोट्याशा खोलीत मिठाच्या पाकिटात अंमली पदार्थ भरून विकणारी टोळी पकडण्यात आली.
मिठाच्या पोत्यात तीनशे कोटीहून अधिकचा माल होता आणि अंगावर फाटके कपडे असलेले तीन आरोपी पोलिसांनी पत्रकारांसमोर उभे केले होते. यातील अयूब मकानदार हा एक आरोपी तर सात वर्षांपूर्वी एका गुह्यात अमली पदार्थांची तस्करी करताना पकडला गेला होता. तेव्हा उद्योगपती कोंडूसकरच्या कुपवाड एमआयडीसी आणि इस्लामपूर येथील फॅक्टरीमध्ये एमडी ड्रगचे उत्पादन होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या प्रकरणाचा तपास पुढे थांबलाच. वाहतूक करणारा आरोपी मकानदार एक क्रीडा प्रशिक्षक आणि औद्योगिक संस्थेचा सचिव म्हणून लोकांना माहीत होता. आता गेली साडेसहा वर्षे त्याने येरवडा जेलमध्ये काढली, सहा महिन्यांपूर्वी तो बाहेर आला आणि पुन्हा त्याने सांगलीतून गोव्याला ड्रग वाहतूक करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या घरात तीनशे कोटीचे ड्रग सापडले. इतकी मोठी रक्कम त्याने स्वत:हून मिळवून व्यवसाय सुरू केला असेल का? अशक्यच. म्हणजेच हे सारे फक्त पंटर आहेत. मुंबईत एका जहाजावर ट्रॅप लावून सिने अभिनेत्याच्या मुलाला आरोपी केलेला अधिकारी आणि त्याचा तपास वादग्रस्त ठरला. बॉलिवूडच्या अनेकांची चौकशी झाली. त्यांना ब्लॅकमेल करणारी टोळीही असून ती परदेशात पैसे स्वीकारते असेही चौकशीत पुढे आले. तत्कालीन सरकार विरोधात राळ उठवली गेली. हेतू साध्य झाले. पुढे तपास बंद. महाराष्ट्र बदनाम झाला. पण, पाळेमुळे उखडली गेली नाहीतच.
आताही तपास विस्मरण होऊन नवे काही पुढे येईपर्यंत चालवला जाईल. लोकांचे ध्यान वळले की पुन्हा तेच! पंजाबमध्ये पिढी बरबाद झाली तशी महाराष्ट्रातही होत आहे. गांजा, अफू, चरस इथून पुढे मजल मारत ब्राऊन शुगर किंवा कोकेन आणि आता कुत्र्या आणि मांजराच्या नावाने विकल्या जाणाऱ्या गोळ्या खपत आहेत. गुह्यांसाठी त्यांचा वापर होत आहे. नशेतील 15, 18 वयाची मुले गुह्यात अटक होत आहेत. आपण कसे क्रूरपणे खून केले ते पोलिसांना सांगत आहेत. आपले फोटो छापून आले पाहिजेत म्हणजे सुटून आल्यावर दहशत होईल अशी त्यांची मानसिकता आहे. परिणामी खून होतात प्रोफेशनल पध्दतीने आणि ते आपणच केले म्हणून भलतेच पोलिसांसमोर उभे राहतात. सत्य आणि तपास यांचा ताळमेळ न्यायालयात तरी कसा लागतो? परिणामी हे प्रकरण तरी सत्य शोधणारे ठरेल का? प्रश्नच आहे.
शिवराज काटकर