For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'ईव्हीएम' ची होणार पडताळणी की प्रात्यक्षिक?

03:17 PM Dec 03, 2024 IST | Radhika Patil
 ईव्हीएम  ची होणार पडताळणी की प्रात्यक्षिक
Will the EVM be verified or demonstrated?
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि मताधिक्य याबाबत संशय घेत कोल्हापूर जिह्यातील पाच विधासभा मतदारसंघांतील 44 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी होणार आहे. एक महिन्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पाच टक्के केंद्रांच्या यंत्रांची तपासणीची मागणी करता येते. यामध्ये संबंधित यंत्रांवर नव्याने केवळ मतदानाचे प्रात्यक्षिक घेऊन पडलेली मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या हे उमेदवार पडताळून पाहू शकतो. त्यामुळे एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी वा फेरपडताळणीची मागणी निकालात निघत असल्याचे स्पष्ट होत आहे.

निवडणूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तपासणी म्हणजे फेरमतमोजणी वा फेरपडताळणी नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवार ज्या 5 टक्के केंद्रावरील यंत्र सांगतील, त्यावर मतदानाचे प्रात्यक्षिक होईल. म्हणजे या यंत्रावर नव्याने 500 किंवा हजार मतदान केले जाईल. हे मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्रावरील चिठ्ठ्या यांची पडताळणी करून ती यंत्रे योग्यप्रकारे कार्यरत असल्याची उमेदवाराला खात्री करून देईल. प्रात्यक्षिक करण्याआधी त्या यंत्रावरील सर्व माहिती पुसावी लागते. त्यानुसार यंत्रावरील प्रत्यक्ष निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती नष्ट होईल. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतमोजणी सुरू असताना फेरमतमोजणी करता येते. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी वा फेरपडताळणीची मागणी ग्राह्य धरली जात नाही, असेही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून निकालाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. मतदानाबाबत ज्या उमेदवारांना शंका आहेत, त्यांनी 5 टक्के केंद्रांच्या निकषानुषार प्रतिमतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅटसाठी 40 हजार रुपये आणि 18 टक्के जीएसटी यानुसार शुल्क विहीत मुदतीत भरावे लागेल. शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या जिह्यातील 5 मतदारसंघांतील एकूण 44 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी उमेदवारांनी केली आहे. दाखल अर्ज निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. ईव्हीएमबाबत ‘इलेक्शन पिटिशन पीरियड’ (ईव्हीएमबाबत न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असल्याने मतमोजणीनंतर 45 दिवस त्यातील डेटा सुरक्षित ठेवण्यात येतो.) कालावधी संपल्यानंतर आयोग अर्जांना मान्यता देईल. आयोगाच्या निर्देशानुसार ‘बीईएल’ कंपनीच्या अभियंत्याकडून उमेदवारासमोर मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राची तपासणी केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.