गगनगड रस्त्यावरील दरडीचा भराव हलवण्याची मागणी
कोल्हापूर :
ढगफुटी पावसामुळे गगनबावडा व दोन्ही घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. मर्द किल्ले गगनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. दत्त जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा दरडीचा भराव हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी येथील भाविक व प्रवासी वर्गातून केली आहे.
22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडे सात या तीन तासांत गगनबावडा,करुळ व भूईबावडा घाट परिसरात विक्रमी 119 मिलीमीटर पाऊस पडला होता. दोन्ही घाटांत दरडींचाच पाऊस पडल्याचा प्रकार घडला होता.
यावेळी गगनबावडा ते गगनगड दरम्यानच्या रस्त्यावर पायरी घाटाच्या अलीकडील वळणावर दरड कोसळली आहे.अडीच महिने झाले तो भराव जैसे थे आहे.या भरावाने अर्धा रस्ता बंद आहे .एकेरी वाहतूक सुरू आहे.
विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या किल्ले गगनगडावरील श्रीदत्त जयंती सोहळा दि. 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने लाखो भाविक गगनगडावर येत असतात. येथील वाहतूक पूर्ववत सुरू होण्यासाठी कोसळलेला दरडीचा भराव हलवावा अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.