आठवा वेतन आयोग लाभदायक ठरेल?
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात आठवा वेतन आयोग भरभरुन माप घालणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने ‘फिटमेंट फॅक्टर’ला संमती दिल्यास कर्मचाऱ्यांना वेतनात 186 टक्के वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे सध्याच्या 18 हजार रुपयांच्या तुलनेत वेतन 50 हजार रुपयांहून अधिक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेतन आयोगाच्या सूचना आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात संमत केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या सूचनांच्या अनुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 इतका असेल अशी अनेक कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. सातव्या वेतना आयोगाने तो 2.57 इतका निर्धारित केला होता. आठव्या वेतन आयोगाकडून तो त्यापेक्षा जास्त दिला जाईल, अशी चर्चा आहे. आठव्या वेतन आयोगात निवृत्तीवेतनातही 186 टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मोठा लाभ होणे शक्य आहे. या आयोगाचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.