मुख्यमंत्रिपदावर पुढील आठवड्यात तोडगा?
दिल्लीत 28 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधीच्या उपस्थितीत होणार बैठक : मुख्यमंत्रिपदावरील संघर्षाला तात्पुरती स्थगिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रदेश काँग्रेसमध्ये टोकाला पोहोचलेला मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष आता तात्पुरता थांबला आहे. पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सर्व काही सोडवले जाणार आहे. याबाबत शनिवारी बेंगळूरमध्ये एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना आश्वासन दिले आहेत. त्यानुसार राहुल गांधी या महिन्याच्या 26 तारखेला परदेश दौऱ्यावरून नवी दिल्लीला परतणार आहेत. पुढील आठवड्यात म्हणजेच 28 तारखेला दिल्लीत बैठक होऊन मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत चर्चा करून हायकमांड संकटावर उपाय सूत्र जाहीर करेल, असे काँग्रेसच्या उच्च सूत्रांनी सांगितले.
गेल्या 2 दिवसांपासून बेंगळूमध्ये वास्तव्यास असलेले एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आपल्या निवासस्थानी बोलावून चर्चा केली आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत सर्व काही सोडवू. तोपर्यंत वाट पाहण्याची सूचना खर्गेंनी दोघांना केली आहे. याला या दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे टोकाला पोहोचलेला मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष आता तात्पुरता थांबला आहे.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सोमवारी रात्री नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. बुधवारी राहुल गांधींना भेटून प्रदेश काँग्रेसमधील संकट सोडवण्यासाठी बैठकीचे नियोजन करतील. बहुतेक सदर बैठक 28 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींच्या निवासस्थानी होईल, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा संघर्षावर तोडगा काढला जाईल. हे संकट आणखी लांबवल्यास पक्षाचे आणि सरकारचे नुकसान होईल, अशी विनंती हायकमांडकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातच प्रदेश काँग्रेसमधील वादावर हायकमांड तोडगा काढेल, असे म्हटले जात आहे.
अनेक नेत्यांची खर्गे यांच्या निवासस्थानी गर्दी
एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे बेंगळूर येथील निवासस्थान हे राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. नेतृत्व बदलाच्या अफवांमुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेत पद गमविण्याची भीतीत असलेले आणि सत्ता मिळविण्यासाठी उत्सुक असलेले नेते खर्गे यांच्या निवासस्थानी गर्दी करू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयातील मंत्री एच. सी. महादेवप्पा, भैरती सुरेश, के. वेंकटेश, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार ए. एस. पोन्नप्पा, कोत्तनूर मंजुनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी खर्गे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
काहीही झाले तरी हायकमांड निर्णय घेईल!
मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यातील राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया
काहीही झाले तरी हायकमांड निर्णय घेईल. बोलण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. मी सध्याच्या राज्यातील घडामोडींबद्दल काहीही बोलणार नाही, असे एसआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले. कर्नाटक काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल रविवारी बेंगळूरमध्ये पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
राज्य काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठीचा लढा तीव्र झाला आहे. सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तसेच, शिवकुमार गटाचे आमदार दिल्लीला जाऊन बेंगळूरला परतले आहेत. काहींनी उघडपणे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, असे म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनी बेंगळूर येथील एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या लढाईने तीव्र रुप धारण केले आहे. याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी नाराजी व्यक्त केली आहे.
मी गेल्या तीन दिवसांपासून बेंगळुरात आहे. मला खूप कंटाळा आला आहे. माझ्याकडे बोलायला काही नाही. मी सध्याच्या घडामोडींबद्दल काहीही बोलणार नाही. विद्यमान घडामोडींबाबत बोलण्यास माझ्याकडे काही नाही. कृपया येथे वाट पाहू नका. काहीही झाले तरी हायकमांड निर्णय घेईल, असे म्हणत त्यांनी राज्य काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली.