यापुढे बेळगाव अधिवेशन जूनमध्ये?
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विचार : विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याची सूचना
बेळगाव : बेळगावात डिसेंबरऐवजी जूनमध्ये अधिवेशन भरविण्याचा विचार पुढे आला आहे. मंगळवारी रात्री काकतीजवळील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीत हा विचार सामोरे आला असून वाढत्या आंदोलनाला वैतागून सरकारने पुढील अधिवेशन डिसेंबरऐवजी जूनमध्ये भरविण्याचा विचार मांडला आहे, अशी माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे आमदार, विधान परिषद सदस्य, मंत्री उपस्थित होते. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांवर आपल्याच पक्षाच्या आमदारांनी टीका करू नये, विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
आमदारांनी विधिमंडळाच्या कामकाजात नियमितपणे व सक्रियपणे भाग घ्यावा, अशी सूचना करतानाच अर्थसंकल्पानंतरचे अधिवेशन जूनमध्ये बेंगळूर येथे भरविण्यात येते. यापुढे बेळगावात हिवाळी अधिवेशनाऐवजी जूनमध्ये अधिवेशन भरविले तर कसे होईल, असा विचारही या बैठकीत पुढे आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात विविध संघटनांची आंदोलने असतात. सरकारला या आंदोलनांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच अर्थसंकल्पाच्या पुढील भागाचे अधिवेशन बेळगावात भरविण्यासंबंधीचा विचार सुरू झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे.