For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ नागरिकांची परवड थांबेल काय?

06:17 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ नागरिकांची परवड थांबेल काय
Advertisement

गोवा म्हटला म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत राज्य अशी ओळख आहे. अशा या राज्यात ज्येष्ठ नागरिकांना समाजाकडून चांगली वागणूक मिळते का, मानसन्मान मिळतो का तसेच कुटुंबाकडून त्यांचे योग्य संगोपन, देखभाल होते का, हा संशोधनाचा विषय ठरेल.

Advertisement

ज्येष्ठ नागरिक म्हणजे आज समाजाचे मार्गदर्शक. समाज जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्यांचा आदर्श गिरवून आजच्या पिढीकडून समाजाची जडणघडण होत असते. अशा या ज्येष्ठ नागरिक घटकाला समाज, कुटुंबाकडून कशापद्धतीने वागणूक मिळते, यावर आत्मपरीक्षण, चिंतन होणे आवश्यक आहे. आज गोव्यात राज्य सरकारबरोबरच विविध संस्थांनी ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम या ऑक्टोबर महिन्यात साजरे केले परंतु या कार्यक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर कितपत ऊहापोह, विचारमंथन झाले? हे कार्यक्रम केवळ ‘शो’पुरते, प्रसिद्धीपुरते झाले काय किंवा कार्यक्रम घ्यायचे म्हणून घेतले जातात काय, असे अनेक प्रश्न मनात सतावतात. अशा या कार्यक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांच्यावरील समाज, कुटुंबाकडून होणाऱ्या अन्यायांवर ऊहापोह होणे आवश्यक आहे. यादृष्टीने विचारमंथन झाले तरच हे ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम सार्थकी ठरतील, असे म्हणावे लागेल.

गोवा सरकारने त्यातल्या त्यात चांगला निर्णय घेतला आहे. समाजकल्याण खात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून खात्याने ‘अलंकित असाईनमेंट्स लिमिटेड’ कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारावर मडगाव रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात खात्याचे संचालक अजित पंचवाडकर व कंपनीचे उपाध्यक्ष संजय भट यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मडगाव मतदारसंघाचे आमदार दिगंबर कामत, समाजकल्याण खात्याचे सचिव ई वल्लवन (आयएएस) यांच्या उपस्थितीत हा करार झाला. प. बंगाल व लक्षद्वीप वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध असून 45 दिवसांत किंवा तत्पूर्वी गोव्यातही सुरू केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन खऱ्या अर्थाने दुवा ठरणार आहे.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मतदार म्हणूनही ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. ज्येष्ठांबद्दल तर सर्व समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांना कुठे ना कुठे गुंतवून ठेवणेही आवश्यक असल्याचे उद्गार आमदार दिगंबर कामत यांनी या कार्यक्रमात काढले आहेत. आमदार कामत यांनी मांडलेल्या या विचाराला अनुसरून समाजाने ज्येष्ठ नागरिकांप्रति वागणे आवश्यक ठरते.

समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांना एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी ते चोखरित्या पार पाडतात. मडगावात झालेल्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात त्यांचे जाहीररित्या कौतुक झाले. त्यांनी कंपनीकडे तगादा लावल्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना साहाय्यता करण्यासाठी सरकारची ही हेल्पलाईन सुरू होणार आहे. या कार्यासाठी खरोखरच पंचवाडकर यांना धन्यवाद द्यावे लागतील.

वृद्धांचे कल्याण होण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आयोगाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी त्यांच्यासाठी बनविलेल्या कायद्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने गोव्यातील ज्येष्ठांना पुटुंब आणि समाजापलीकडे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.  आज गोव्यात ज्येष्ठ नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन काही समाजसेवक पुढे आलेले आहेत. पेडणे तालुक्यातील विर्नोडा भागात वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या टिफिनला गेल्या सप्टेंबरमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. याबद्दल या योजनेचे संस्थापक दुर्गादास परब यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. जे गरीब, निराधार आहेत किंवा जे घरात एकटेच राहतात तसेच ज्यांची मुले गोव्याबाहेर स्थायिक असल्याने ज्या वृद्धांची गैरसोय होते, अशा सुमारे सहा वडिलधाऱ्यांना दुपारचे तसेच रात्रीचे जेवण देण्याची कल्पना पतंजली योगाचे गोवा प्रभारी विश्वास कोरगावकर यांनी मांडली आणि ही योजना दुर्गादास परब यांच्या पुढाकाराने सुरू झाली. यासाठी अनेक विर्नोडावासियांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

या योजनेसाठी आचारी म्हणून गावातील दोन महिला कार्यरत आहेत. या महिला अल्पशा मानधनावर वडिलधाऱ्यांना दुपारी, रात्री टिफिन सेवा देण्याचे कार्य नित्यनेमाने प्रामाणिकपणे बजावित आहेत. याबद्दल या महिला आचारींनाही धन्यवाद द्यावे लागतील. या योजनेसाठी देणग्या केवळ विर्नोडा ग्रामस्थांकडूनच घेतल्या जातात. ही योजना गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे सुरू आहे. हा प्रकल्प अद्वितीय, अभिनव आहे आणि अन्य गावातील रहिवासियांनीही याबद्दल जाणून घेऊन ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून गरजू वृद्धांना, वडिलधाऱ्यांना दिलासा मिळेल, असे या योजनेचे संस्थापक दुर्गादास परब यांचे म्हणणे आहे. दुर्गादास परब हे मूळचे विर्नोडा येथील असून सध्या म्हापसा येथे स्थायिक आहेत. एलआयसी म्हापसा कार्यालयाचे ते निवृत्त विकास अधिकारी आहेत. त्यांनी ऊर्जा फाऊंडेशन, अक्षय ऊर्जा या संस्थांचीही स्थापना केली असून याअंतर्गत गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात. विविध टेकिंग मोहिमांचेही त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले आहे. समाजसेवेबरोबरच पर्यावरण रक्षण चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. गरिबीचे चटके सहन करीत वर आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने समाजात होणारी ज्येष्ठ नागरिकांची परवड पाहिली व त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकारक ठरण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला. अशाप्रकारे ज्येष्ठांप्रति भावना जागरुक झाल्यास गोव्यातील ज्येष्ठांची वाटचाल, आयुष्याची संध्याकाळ खऱ्या अर्थाने रमणीय, सुखकारक ठरणार आहे, यात वादच नाही.

विर्नोडाप्रमाणेच अन्य गावांतही काही ज्येष्ठ नागरिक असतील, जे एकाकी जीवन जगत असतील किंवा कुटुंबाकडून त्यांना वेगळे ठेवले असतील. कुटुंबाकडून अलिप्त राहिल्याने म्हणा किंवा गरिबीमुळे काहींची उपासमार होत असेल किंवा ज्यांची मुले परदेशात किंवा अन्य राज्यात स्थायिक असतील व त्या वृद्धांचा आधार हरपलेला असेल. अशा वृद्धांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी दुर्गादास परब यांच्या पावलावर पाऊल ठेवून अन्य समाजसेवकांनी किंवा सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आज एकत्रित कुटुंबपद्धती जवळपास नाहिशी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची कुठेतरी फरफट होते आहे. हा प्रश्न निव्वळ गोव्यापुरता नसून महाराष्ट्र, कर्नाटक, इतर राज्यातही जाणवतो आहे. ज्येष्ठांचा आदर राखावा, यासाठी आज गोव्यातील काही शैक्षणिक संस्था आजी-आजोबा दिन साजरा करतात. गणेशपुरी-म्हापसा येथील विद्याभारती गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्याची धुरा सांभाळीत असताना साहित्यिक गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर यांनी आजी-आजोबा दिवस दरवर्षी या शैक्षणिक संस्थेमध्ये आयोजित करून ज्येष्ठांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले होते. प्राचार्य गजानन मांद्रेकर हल्लीच निवृत्त झाले असून त्यांचा आदर्श इतर संस्थांनी गिरवावा, असे प्रामाणिक मत आहे.

मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी सुरुवातीला विचार केला तो ज्येष्ठांचा. त्यांनी दयानंद निराधार योजना ज्येष्ठांसाठी सुरू केल्याने ज्येष्ठांना चांगल्याप्रकारे आधार दिला आहे. या अर्थसाहाय्यातूनही काही वयस्क मंडळी आपला उदरनिर्वाह चालवितात. काहींचा त्यातून औषध-पाण्याचा खर्चही भागत आहे. काही गावात काही संस्थांनी उम्मीद केंद्र सुरू करून ज्येष्ठांना विरंगुळा मिळवून दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना आदर मिळायला पाहिजे. त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळायला हव्यात. गोव्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण वाढलेले आढळून येते. ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंशाची समस्या आहे, त्यांना सरकारचा पाठिंबा मिळायला हवा. त्यासाठी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता मात्र सरकार ठोस आश्वासन देऊ शकले नाही, असा विजय सरदेसाई यांचा आरोप आहे.  ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते गुन्हे हीसुद्धा एक चिंतेची बाब आहे. पोलिसांनी   एकाकी जीवन कंठीत असलेल्या वृद्धांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून हा घटक सुरक्षित राहिल. दिव्यांग व्यक्ती आयोगाप्रमाणेच सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करण्याचा विचार करावा जेणेकरून अशा या संवेदनशील घटकाला जलद न्याय मिळू शकेल.

राजेश परब

Advertisement
Tags :

.