उत्साह नी उत्सुकता
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 70 टक्के मतदारांनी आपला कौल मशिनबंद केला आहे. अधिकृत आकडे उद्या जाहीर होतील पण मतांचा टक्का चांगला आणि सर्वत्र वाढला आहे, तो कुणाला फायदेशीर याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. ओघानेच आता उत्सुकता लागली आहे ती मतदारांनी कौल कुणाला दिला याची. अंदाज वगैरे व्यक्त होत आहेत पण 9 कोटी सत्तर लाख मतदार मतदानाने कोणाच्या हाती महाराष्ट्र सोपवतात याची चुरस दिसते आहे. सत्ता कुणाची व मुख्यमंत्री कोण हे शनिवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. निवडून आलेले आमदार मतदारांचा कौल मानतात की सोईच्या बेरजा वजाबाक्या आणि ऑपरेशन करुन सोईचे राजकारण साधतात, याचेही कुतूहल राहणार आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. निवडणुकीत 4136 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, कॉंग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आणि आपापल्या छावण्यातील मोठे भाऊ. फुटलेली शिवसेना, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरी वंचित आघाडी, जोडीला स्वराज्य पक्ष, मनसे आणि काही अपक्ष, काही स्वत:हून उभारलेली, काही जाणीवपूर्वक उभे केलेले उमेदवार. दोन्ही, तिन्ही पातळीवर साम, दाम, दंड, भेद यांचा वापर आणि टोकाचा संघर्ष यामुळे ही निवडणूक अभूतपूर्व बनली आहे. एकाच टप्प्यात मतदान व मतमोजणी हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्या आहे. महाराष्ट्रासोबत झारखंडमध्येही निवडणूक होती, चुरस होती महाराष्ट्राएवढी नाही पण तेथे 68 टक्के मतदानाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तीव्र चुरस आणि अनेक आयाम यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची, चुरशीची, अनेकांच्या भवितव्याची आणि केंद्रीय राजकारणावर परिणाम करणारी ठरली. आता मतमोजणीनंतर महाराष्ट्राला स्थिर, भक्कम सरकार व मुख्यमंत्री मिळावा अशी मनिषा असली तरी ती पूर्ण होईलच असे नाही. मतमोजणी पूर्वीच सत्तेचे खेळ सूर झालेत हे वेगळे सांगायला नको. नवीन सरकार मतमोजणीनंतर तीन दिवसांत सत्तारुढ होणे कायदेशीर दृष्टीने गरजेचे आहे. सत्तेचा खेळ सुरु झाला तर राज्यात राज्यपाल राजवट लागू होण्याची भीती आहे. पण मतदार सुज्ञ आहेत ते स्पष्ट कौल देतील अशी अपेक्षा आहे. सर्वात मोठा पक्ष कोणता होतो व राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला संधी देतात हे पण महत्त्वाचे आहे. चारच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने सत्तारुढ महायुतीला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर महायुती सावध आणि महाआघाडी उत्साहात होती पण गेल्या तीन महिन्यांत अनेक गोष्टीचा परिणाम मतदारांवर दिसतो आहे. जरांगे फॅक्टर थोडा थंडावला असला तरी तो मराठवाड्यात धग धरुन आहे. महायुतीने मध्यप्रदेश सरकार धर्तीवर लाडकी बहिण योजना आखून तीचे हप्ते महिलांच्या बचतखात्यावर जमा केले. सिलेंडर मोफत, वीज बील माफी, हमी भाव, महिलांना प्रवास सवलतीत वगैरे निर्णय घेतले हे निर्णय व लाडक्या बहिणीची संख्या गेमचेंजर आहे पण या बहिणी महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहणार का? हा लाखमोलाचा सवाल आहे. कॉंगेसने महालक्ष्मी योजना देणार म्हटले आहे. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा लोकसभेचा मराठा, मुस्लिम, दलित हा यशस्वी फॉर्म्युला आणि आरक्षण व संविधान बचाव हेच मुद्दे या वेळच्या प्रचारात पुन्हा जोरदार रेटले पण महाआघाडीत चेहरा, मोठा भाऊ, तिकीट वाटप यावरुन सुरु झालेले मतभेद अखेरपर्यंत कायम राहिले. ओघानेच काही ठिकाणी ‘सांगली पॅटर्न’ तर काही ठिकाणी बंड झाले. भाजपने लोकसभेच्या वेळचा मतदानाचा कौल अभ्यासून ‘कटेगें तो बटंगे’ ‘एक है तो सेफ है’ असे नारे दिले आणि मुस्लिम एकगठ्ठा मतदानाला ‘व्होट जिहाद’ संबोधून हिंदू व्होट बॅंक घट्ट केली. योगी आदित्यनाथ, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि साधू संत, महंत यांनी आत्ता नाही तर कधीच नाही असे म्हणत हिंदूंना ‘जाग उठो’ अशी हाक दिली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्ला करताना पक्ष फोडला, चिन्ह-नाव पळवले, उद्योग व्यवसाय गुजरातला नेले, पन्नास खोकी, गद्दार, महाराष्ट्र द्रोही असे हुकमी बाण काढले होते. त्यामुळे मतदानानंतरही कुणालाच कशाची खात्री वा विश्वास उरलेला नाही. सत्ता कुणाची आणि मुख्यमंत्री कोण आणि किती दिवसांसाठी यांची उत्तरे निकालात आणि भविष्याच्या वाटचालीत दडली आहेत. मुख्यमंत्री कोण होणार यावर महाराष्ट्रातील आगामी आंदोलने आकार घेणार हे उघड आहे. महाराष्ट्र जाती पातीच्या विद्वेशातून मुक्त होणार का? असे अनेक प्रश्न निकालाच्या या गर्भात दडलेले आहेत. मतदानाच्या आदल्या रात्री काही घडलेले, घडवलेले अनेक बरे वाईट प्रसंग मतदारांसमोर आले. पैसे, दारु, भेटवस्तू वाटण्याच्या, खुनाच्या धमक्या दिल्या अशा
तक्रारी झाल्या. निवडणूक आयोगाने यंदा विक्रमी अवैध रक्कम पकडली. धाडसत्रे व बॅग तपासणी कुणालाही चुकली नाही. धनदांडगे, जात दांडगे आणि प्रस्थापित जोडीला घराणेशाहीच्या पुढच्या पिढ्या या निवडणुकीत सरसावलेल्या दिसल्या. महाराष्ट्राचे हित, रिकामी तिजोरी, विकास, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अनाचार यांना कोण व कशी वाट दाखवणार असे मुद्दे दुर्लक्षले गेले. अनेक ठिकाणी तेच ते उभे आहेत. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे सर्व ठिकाणीचे मुद्दे व ठोसे वेगवेगळे आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 70 टक्के मतदान झाले आहे. यंत्रणा मतदानानंतर मतमोजणीसाठी तर नेते सत्ता व खुर्चीसाठी अॅक्शन मोडवर आहेत. मी पुन्हा येणार हे फडणवीस खरे करतात की मराठा यशस्वी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे खुर्ची राखतात, अजितदादाना संधी मिळते का? की सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, नाना पटोले बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, जयंत पाटील कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते हे बघावे लागेल. पण मतदानात उत्साह आणि मतदानानंतरची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणता मुद्दा गेमचेंजर ठरला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल पण आगामी चार दिवस सत्ता कारणासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मतदार महाराष्ट्र कुणाच्या हाती सोपवतात यावर त्यांचे व महाराष्ट्राचे भवितव्य ठरणार आहे.