...तरीही मागण्या मान्य करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन : आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा दावा
पणजी : टॅक्सीचालक, मालकांच्या सर्व मागण्या यापूर्वीच सोडविलेल्या असतानाही त्यांनी आंदोलन मागे न घेता ‘चक्का जाम’ आदी मार्गांनी सुरूच ठेवले आहे. हा प्रकार पाहता हे संपूर्ण आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सिद्ध होते, त्याचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होणार आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी केला. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दिल्लीहून दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना हाच आरोप केला होता. पेडणे भागातील टॅक्सीचालकांनी शुक्रवारी आल्तीनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यापैकी दहा जणांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे कोणत्याही चर्चेविना सर्वांना माघारी फिरणे भाग पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
टॅक्सीचालकांच्या समस्यांवर लक्ष
आपल्या सरकारने टॅक्सी ऑपरेटर्सच्या समस्यांवर सातत्याने लक्ष दिले आहे. त्यांच्या विविध समस्या सोडविल्या आहेत. मागण्या पूर्ण केल्या आहेत. टॅक्सी ऑपरेटर्सनी अॅप-आधारित ऍग्रीगेटरचा अवलंब करावा किंवा स्वत:चे अॅप विकसित करावे, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यास सर्वांनी सहमती दर्शवली होती. तरीही समाधान न मानता त्यांनी आंदोलन चालू केले आहे. आंदोलनाच्या सर्व बाजू पाहता सध्याचे आंदोलन निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजकीय फायद्यासाठी आपणाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पार्किंग शुल्क 200 ऊपयांवरून 80 ऊपये करण्यात आले आहे. पार्किंग कालावधी वाढविला असून ऑपरेटरच्या विनंतीनुसार निळ्या कॅब तसेच स्टँड प्रदान केले आहे. राज्यातील प्रमुख पर्यटन व्यवसायिक तसेच विरोधी आमदारांनीही अॅप आधारित टॅक्सी सेवेला संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पेडणेतील टॅक्सी चालकांप्रती आपणास पूर्ण सहानूभूती असून यापुढेही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे हे कर्तव्य समजून त्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सर्व मागण्या मान्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : आर्लेकर
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेले पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. त्या सर्व मान्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तरीही या आंदोलनकर्त्यांमधील केवळ पेडणेतील टॅक्सी ऑपरेटर्सच्या शिष्टमंडळास भेटण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविली होती. परंतु तो प्रस्ताव ऑपरेटर्सना अमान्य झाल्याने मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच ते माघारी फिरले, असे आर्लेकर यांनी सांगितले.