कामगारांना मृत्यू आल्यास बोटमालकांना द्यावे लागतील 25 लाख
मुख्यमंत्र्यांनी केली कुटबण जेटीची पाहणी : आठ दिवसांत उपाययोजना आखण्याचे आदेश
मडगाव : कुटबण-मोबोर मच्छीमार जेटीवर कॉलेरा व डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. पाच कामगारांचा बळी गेल्यानंतरच सरकारला जाग आली असून काल बुधवारी मुख्घ्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटबण जेटीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मृत्यू आलेल्या मजूरांना सरकारतर्फे 5 लाख रुपये दिले जातील तर बोट मालकांनी 5 लाख रूपये मयत मजूरांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. जर या आदेशाचे पालन नाही केले तर परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला. तसेच या पुढे मजूरांना मृत्यू आल्यास बोटमालकांना 25 लाख रुपये द्यावे लागतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुटबण जेटीवरील चार व मोबोर येथील एका कामगाराचा मृत्यू झाल्याने या भागात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल प्रत्यक्ष कुटबण जेटीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जेटीवरील बेकायदेशीर बांधकामे पाडावी, जेटीवरील तुटलेल्या बोटी व फलक आठ दिवसांत हटविण्याचे आदेश दिले.
मत्स्यपालन कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच बरोबर नव्या जेटीचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे सांगितले. यावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार व्रुझ सिल्वा, जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू व उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणीवेळी मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेटीवरील 350 बोटी नोंदणीकृत आहेत. पैकी 280 बोटी सध्या कार्यरत आहेत. एका बोटीवर साधारण 25 कामगार असे 3500 कामगार आहेत. कामगारांची आधारकार्डद्वारे नोंद करून घेतली जाते. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुटबण येथील चार व मोबोर येथील बोटीवरील एका कामगाराचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने बोटीतून आणतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
बोटमालकांचा निष्काळजीपणा उघड
कामगारांची प्रकृती बिघडली असताना ही त्यांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी पाठविणे व वेळीच वैद्यकीय उपचार करण्यासाठी तत्परता न दाखविणे यामुळे बोटमालकांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली.
सेन्सरची जैव शौचालये बदलण्याचा सूचना
मुख्यमंत्र्यांनी जेटी परिसरात उभारण्यात आलेल्या 50 जैवशौचालयावरून अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच कामगारांसाठी सेंसर असलेली जैवशोचालय बनवताना थोडातरी विचार होण्याची गरज आहे. हे पंचतारांकित हॉटेल आहे का ? अशी विचारणा यावेळी केली. तसेच तत्काळ सेन्सर असलेली जैवशौचालये बदलून साधी जैवशौचालये उभारण्याचा आदेश दिला. तसेच स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमावा, कामगारांकडून पैसे न घेता कामगारनिहाय बोटमालकांकडून पैसे आकारण्याचेही आदेश दिले.
कामगारांची आरोग्य तपासणी करावी
कामगारांना बोटीवर घेण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करावी, ते तंदुरूस्त असल्यासच त्यांना कामावर घ्यावे, सध्या जे कामगार मृत्यू पावलेत त्यांच्या कुटुंबियांना बोटमालक 5 लाख देतील व कॉर्पस निधीतून सरकार पाच लाखांची मदत करेल. भविष्यात कामागराचा मृत्यू झाल्यास 25 लाखांचा दंड बोटमालकांना द्यावा लागेल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अटींमध्ये तसे बदल करण्याच्या सूचना केल्या.
जुन्या बोटींचा लिलाव करा
अनेक वर्षापासून जेटीवर मोडलेल्या बोटी नांगरून ठेवण्यात आलेल्या आहेत. मत्स्य खात्यातर्फे यास 5 हजारांचा दंड दिला जातो. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत आता दंड वगैरे बंद करावेत व ज्यांना आधी नोटिसा दिलेल्या आहेत त्यांनी जुन्या बोटी तत्काळ न काढल्यास त्या बोटींचा लिलाव करावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित कारवाई करावी आठ दिवसांत जुन्या व नादुरुस्त बोटी जेटीवरून हटविण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मत्स्य खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांना हटवले : सुश्री यशस्विनी बी. यांच्याकडे संचालक पदाचा अतिरिक्त ताबा
मच्छीमार खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका सुश्री यशस्विनी बी. यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. कार्मिक खात्याचे सचिव इशांत व्ही सावंत यांनी सुश्री यशस्विनी बी. यांच्या नियुक्तीचा काल बुधवारी आदेश काढला आहे. कार्मिक खात्याने काढलेल्या आदेशानुसार, माहिती तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स व्यवस्थापकीय संचालक, गोवा माहिती तंत्रज्ञानाचा कार्यभार विकास महामंडळ संचालकपदाचा कार्यभार सांभाळण्याबरोबरच मस्त्य पालन खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. कुटबण जेटीवरील चार व मोबोर येथील एका कामगाराचा मृत्यू झाल्याने या भागात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केली होती. याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी मस्त्य पालन खात्याच्या संचालिका शर्मिला मोंतेरो यांना हटवून त्यांच्या जागी आता सुश्री यशस्विनी बी. यांची नेमणूक करण्यात आली आहे.