For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरक्षण घेऊनच परतणार!

06:55 AM Aug 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आरक्षण घेऊनच परतणार
Advertisement

मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून एल्गार :भर पावसातही मराठा आंदोलक ठाम : चिखलात ठिय्या

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन शुक्रवारी  मुंबईत धडकले. आझाद मैदान चिखलाने आणि पाण्याने भरले असतानाही आंदोलकांनी हार न मानता ठिय्या दिला. ‘आता आरक्षण घेऊनच परत जाणार’ हा निर्धार त्यांनी व्यक्त केला.   मराठा आंदोलनाचे नेतफत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी  आझाद मैदानात दाखल झाले आणि ठरल्याप्रमाणे उपोषणास सुऊवात केली. अधिकृत परवानगी फक्त काही मोजक्या आंदोलकांनाच होती, तरीदेखील मराठा समाजाचे कार्यकर्ते बंदी झुगारून सीएसएमटी, महापालिका चौक आणि आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले. परिणामी संपूर्ण दक्षिण मुंबई आंदोलकांनी फुलून गेली.    दरम्यान, सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. मैदानात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. तरी आंदोलक मागे हटले नाहीत. काहींनी पावसात भिजत चिखलात उभे राहून घोषणाबाजी केली, तर काही थेट चिखलात बसून आंदोलनात सहभागी झाले.

Advertisement

रेनकोट, छत्र्या घेऊन आलेल्यांनी त्या आधारावर सहभाग नोंदवला, तर इतर आंदोलक पावसात भिजतच संघर्ष करत राहिले. यावेळी जरांगे-पाटील म्हणाले त्याप्रमाणे, ‘आता ही लढाई आरपारची आहे. आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार. आंदोलक ऊन, वारा, पाऊस काहीही आले तरी हटणार नाहीत. आम्ही अर्धी भाकर खाऊ, उघड्यावर राहू पण आदेशापासून ढळणार नाही.’   आजच्या आंदोलनात महिलांची उपस्थिती कमी होती, मात्र तऊणांचा मोठा जमाव उपस्थित राहिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे तऊण आंदोलन कितीही दिवस चालले तरी ठामपणे टिकून राहणार असल्याचे सांगत होते. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांचा ओघ सुरूच होता, ज्यामुळे आझाद मैदान परिसर घोषणाबाजीने आणि संघर्षाच्या जिद्दीने पेटून राहिला.

व्यासपीठावर येताच मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आणि गणेशपूजन करून दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला सुऊवात केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होणार हे निश्चित झाल्यानंतर आझाद मैदानात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पहिली लढाई जिंकल्याचा आनंद

पहिली लढाई जिंकल्याचा आनंद मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यामुळे आता आरक्षणासाठी ही आरपारची अंतिम लढाई असल्याचे त्यांनी घोषित केले. आता माघार नाही. आता मागे फिरू ते आरक्षण घेऊनच. ते होणार नसेल तर गोळ्या झेलू, पण माघार नाही. तुऊंगात डांबले तर समाजासाठी सडत राहू, पण आंदोलन सुरूच ठेवू असे म्हणत त्यांनी आता मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार करत आपल्या लढ्याची दिशाच जाहीर करून टाकली.

आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुऊवात केली आहे. या आंदोलनासाठी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, आंदोलनासाठी काही अटी शर्तींसह आता आणखी एका दिवसासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शनिवारसाठी आझाद मैदान पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा कऊन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.

इंग्रजांपेक्षाही बेकार सरकार - मनोज जरांगे संतप्त

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. परंतु त्यांचे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणू सरकार त्यांना त्रास देत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारची तुलना इंग्रजी राजवटीशी केली असून, इंग्रजांपेक्षाही हे बेकार असल्याची टिप्पणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहे. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. सुऊवातीला मुंबईत आंदोलन होऊच नये यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाने काही अटी लादून एक दिवसाची परवानगी दिली. त्यातही आंदोलनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी ठेवली. त्यावेळेत फक्त पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात प्रवेशाची अट ठेवली. या सर्व अटी पहिल्याच दिवशी कोलमडल्या. आंदोलकांनी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात प्रवेश केला. एक दिवसाचे आंदोलन दोन दिवसांवर नेले. हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे. आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत. कारण आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही. हे आंदोलन मोडावे की चालू ठेवावे हे सरकारच्या हातात आहे. त्यांनी आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी म्हटले आहे.

आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका

मराठा समाजाच्या मागणीवर  राज्य सरकार सकारात्मक आहे. या मागण्यांबाबत सरकार  मराठा  समाजाच्या पाठीशी आहे. परंतु,  काही लोकांकडून मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुऊ आहे. मात्र, अशाप्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. यातून तुमचे  तोंड भाजेल, असा इशारा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांना दिला. त्याचवेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागणीवर कायदेशीर भूमिका घेण्याचे आवाहन विरोधी पक्षाला केले.

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतफत्वाखालील मराठा समाज मुंबईत एकवटला आहे. आंदोलकांनी आझाद मैदानात आंदोलन सुऊ करताना काही आंदोलकांनी मंत्रालय परिसरात जमून जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मराठा आंदोलनावरून विरोधकांना चांगलेच सुनावले. एखाद्या  निर्णयाचा परिणाम दीर्घकाळ असतो.  त्यामुळे  असे निर्णय  सर्वसमावेशक आणि चर्चेतून घ्यायचे असतात. लोकांना एकमेकांसमोर झुंजवणे  आणि प्यादे लढवणे  हे या  सरकारचे धोरण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सध्या वेगवेगळे पक्ष यासंदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत. त्या पक्षांना माझे आवाहन आहे की वेगवेगळी भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची असेल तर ठाम भूमिका घ्या. मात्र, हे पक्ष ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष   मराठा आरक्षणावर कायदेशीर भूमिका सांगणार नाहीत. पारण त्यांना समाजासमाजात भांडण होताना  कुठेतरी राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मागच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून त्या पत्रावर  सह्या घेतल्या  आहेत.  त्यांची भूमिका त्या पत्रातून  बाहेर आली आहे. त्यामुळे आता सोयीची भूमिका घेणे आणि लोकांची दिशाभूल करणे थांबवले पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राची सामाजिक वीण कशी नीट ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

आंदोलनातून मार्ग काढू

मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर आम्ही मार्ग काढू. राज्य सरकारने यापूर्वीच मंत्रिमंडळाची  उपसमिती नेमली आहे. या उपसमितीकडे आम्ही  काही मागण्या पाठवल्या आहेत. यावर समिती विचार करत आहे. मराठा  समाजाला  केवळ आश्वासन देऊन चालणार नाही तर त्यातून कायदेशीर आणि  संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. हा  मार्ग कसा काढता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत,  अशी परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये. सरकारला ओबीसी समाजालाही  सांभाळावे लागेल आणि  मराठा समाजालाही  न्याय द्यावा लागेल.   गेल्या 10 वर्षात मराठा समाजाला आमच्याच काळात  न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला  आरक्षण देण्याचे काम आम्ही केले. मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या योजना आमच्या सरकारने सुऊ केल्याचे  फडणवीस म्हणाले.

मराठा आंदोलनाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका सहकार्याची आहे. लोकशाही पद्धतीने एखादे आंदोलन चालणार असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही. लोकशाहीत चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन हा त्याचा एक मार्ग असतो. उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत,  त्यानुसार आंदोलनाला सहकार्य केले जात असल्याने आंदोलकांनी आडमुठेपणाने वागू नये, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेर्.िं

ओबीसी महासंघाचा एल्गार  

ओबीसींची मतं घेताना त्यांच्याकडे येता आणि निवडणूक संपल्यावर ओबीसींना वाऱ्यावर सोडता, अशी भूमिका चालणार नाही. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात राजकीय पक्षांनी खास करून महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. महायुती आणि विद्यमान सरकारने सुद्धा ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आपली ही जुनी भूमिका पुन्हा अधोरेखित करावी, अशी अपेक्षाही ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसी आरक्षण काढून देता येणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

ओबीसी समाजाचं आरक्षण काढून किंवा इतर कुठल्याही समाजाचे काढून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळतायेत त्या मराठा समाजालाही आम्ही देतो. जे योग्य आहे, नियमात बसतंय, त्यासाठी सरकार अजूनही सकारात्मक आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी, भाषण करताना आता मागे हटणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी चालतील पण आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना गोळ्या घालणं हे सरकारचं काम नाही. कुणाचही आरक्षण कमी न करता, कुणालाही नुकसान न होऊ देता, जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी  दिली. यावेळी, त्यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी शिंदे बोलत होते. कुणाचही आरक्षण कमी न करता, कुणाचही नुकसान न करता आरक्षण देण्याची तयारी आहे. गोळ्या घालण्याचे काम सरकारचं नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. जे आम्ही दिले त्यावर हे टीका करतात, पण त्यांनीच हे आरक्षण टिकवलं नाही. विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, आम्ही बैठकीला बोलावल्यावर विरोधक बैठकीलाही येत नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजावर सरकार कुठलाही अन्याय करणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. भविष्यात सरकारला ज्या सूचना केल्या जातील. त्या सूचना लक्षात घेतल्या जातील. योग्य, कायदेशीर, नियमात बसणारी मागणी असेल तर याबाबत सरकार सकारात्मक आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Advertisement
Tags :

.