महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रादेशिक पक्ष भाजपाला पंक्चर करणार काय?

06:51 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंधरा दिवसात निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चिवट झुंज देत असलेले प्रादेशिक पक्ष तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे नरेंद्र मोदींचे स्वप्न भंग करू शकतात. निवडणुकीचा मधला टप्पा पार पडला असताना जे चित्र दिसत आहे ते असे की विविध राज्यात वेगवेगळे प्रादेशिक पक्ष हे भाजपला ‘सळो की पळो’ करून सोडत आहेत. यातील बरेच पक्ष हे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे भाग असल्याने त्यांची झालेली एकी ही भाजपच्या अडचणीची ठरत आहे. प्रादेशिक पक्षांना खिजगणतीतच न घेणारे भाजप हे आपणच ‘वनराज’ आहोत आणि ‘शेर’ मोदीजींना आडवा करणारा अजून जन्माला यायचा आहे हेच पालुपद म्हणत आहेत.

Advertisement

जंगलात सिंह हा प्राण्यांचा राजा असला तरी तो आपली आब राखून असतो. उगीच भलत्यासलत्याच्या तो मागे लागत नाही. असे म्हणतात की वाघ-सिंह कोणाला घाबरतात तर ते म्हणजे जंगली कुत्र्यांना. कळपात राहणारी ही कुत्री छोटी असली तरी एकत्र येऊन हुशारीने लढतात. गनिमी कावा वापरून एकाच वेळी विविध प्रकारे आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वारंवार वार करून पसार होतात आणि त्याचा पिच्छा सोडत नाहीत. शेवटी थकलेभागलेले वाघ-सिंह हे त्यांचा नाद सोडून निघून जातात. येत्या निवडणुकीत असेच काहीसे बघावयास मिळत आहे. मोदी-शहा यांनी गेल्या पाच वर्षात प्रादेशिक पक्षांची विविध तऱ्हेने अशी छळवणूक केलेली आहे त्याने ते त्वेषाने पेटले आहेत. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’च्या प्रमाणे मागीलपुढील फारसे न बघता मोदींना आताच रोखले नाही तर ते आपल्या घरावर गाढवाचा नांगर फिरवतील या भीतीने हे पक्ष जिवाच्या आकांताने लढत आहेत. बरेवाईट काहीही म्हणा, स्वतंत्र भारतातील ही पहिली निवडणूक आहे की ज्यात ‘बदले की आग’ झळकत आहे. राजकारणातील विरोधक हे प्रतिस्पर्धी न राहता एक प्रकारे वैरी बनले आहेत असे अजब चित्र दिसत आहे.

Advertisement

भाजप हा या निवडणुकीत ‘एक नंबर’ चा पक्ष बनू शकतो याची त्यांना जाणीव आहे. पण भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आपण जर यशस्वी ठरलो तर मोदी-शहा यांचा फुसका फुगा फुटेल. त्यांना आपल्यावर अवलंबून राहावे लागेल आणि आपण निवांत राहू शकू अशी प्रादेशिक पक्षांची समज आहे. ती फारशी चुकीची नाही. गेल्या दहा वर्षात प्रादेशिक पक्षांना एवढे कडू अनुभव आलेले आहेत की यंदा बऱ्यापैकी निकाल लागले नाहीत तर आपलाच निकाल लागू शकतो अशी खूणगाठ त्यांनी बांधली आहे.

जर समजा भाजपला 543 सदस्यीय लोकसभेत केवळ 225 पर्यंत जागा मिळाल्या तर बहुमताचा 272 चा आकडा गाठण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागेल आणि उंबरठे झिजवावे लागतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अशा परीस्थितीत भाजपला मित्रपक्ष मिळणे अवघड आहे अशी स्पष्टोक्ती असंतुष्ट सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केलेली आहे.

भाजप बहुमताच्या बऱ्यापैकी खाली राहिले आणि काँग्रेसने शतक ओलांडून थोडी अजून वाटचाल केली तर त्याबरोबर जाण्याचा बहुतांश प्रादेशिक पक्षांचा मानस झाला आहे असे आताच बोलले जात आहे. 1996 साली भाजप पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अवघे 13 दिवस टिकले होते कारण बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर झालेल्या त्या निवडणुकीनंतर त्याची साथ देण्यास कोणताच प्रादेशिक पक्ष तयार झाला नव्हता. मोदी-शहा यांनी ईडी आणि इतर तपास संस्थांचा जो ससेमिरा आपल्या विरोधकांमागे लावला त्याने भाजपचा धसका गैर भाजप पक्षांनी घेतलेला आहे.  गेल्याच आठवड्यात जामिनावर सुटलेले दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल हे याचे चालतेबोलते उदहारण आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते प्रचाराला लागले आहेत. त्यांचा प्रचार प्रभावी होत आहे हे ज्याप्रकारे भाजपने त्यांच्यावर प्रती हल्ला चालवला आहे त्याने दिसून येत आहे.

शिवराज सिंग चौहान, वसुंधरा राजे वगैरेंना ठिकाणावर लावल्यावर मोदी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या मागे पडतील असे भाकीत करून त्यांनी सत्ताधारी पक्षातच आग लावून दिलेली आहे. लंकेत हनुमानाने केलेली कामगिरी केजरीवाल भाजपमध्ये करत आहेत असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाला भलताच त्रास होत आहे याची अप्रत्यक्ष कबुली साक्षात मोदी यांनी नुकतीच दिली. या पक्षांनी काँग्रेसची साथ सोडून आपल्याबरोबर काम करावे हा पंतप्रधानांचा सल्ला म्हणजे याचीच पावती होय. या पक्षांना मिळत असलेली सहानभूती आपली हवा टाइट करेल अशी भीती भाजपला वाटत आहे. ठाकरे आणि पवार यांचे पक्ष फोडण्याची आपली खेळी अंगलट येत आहे हे त्यांना दिसत आहे. जर सर्वनाशाची वेळ आली तर हुशार लोक शिताफीने आपले नुकसान कमी कसे होईल ते बघतात त्यातलाच हा प्रकार आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील वादग्रस्त 370 कलम रद्द करून साऱ्या देशभर त्याचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपने काश्मीर खोऱ्यात एक देखील उमेदवार उतरवला नाही आहे यातून गेल्या 5-10 वर्षात स्थानिक लोकांशी तिने किती सलगी निर्माण केली आहे की कसे याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुकांची वाटच पाहत होते. गमतीची गोष्ट अशी की बहुतांशी हिंदू असलेल्या जम्मू विभागात देखील भाजपला निवडणूक सोपी जात नाही आहे. तेथील स्थानिक लोकांना विशेषत: प्रभावशाली अशा डोग्रा समाजाला हे कलम घालवल्याने ‘बाहेरच्यांची’ भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनादेखील कडव्या मुकाबल्याला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या दहा वर्षात लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू न शकलेला काँग्रेस हा देखील एक प्रकारे प्रादेशिक पक्ष झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा लढवून तो जास्तीत जास्त जागा पटकावण्याची पराकाष्ठा करत आहे. पक्षाकडे पैसे नसल्याने काही उमेदवारांना आपल्या उमेदवारीवर पाणी सोडण्याचे अजब संकट ओढवले

आहे. मोदी समर्थकांच्या अनुसार पंतप्रधान हे काही कोणा कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सहजी 300 जागा मिळवू शकतील अशी व्यूहरचना केलेली आहे. उत्तरेतील राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या ज्या थोड्याबहुत जागा कमी होतील त्याची भरपाई ते बंगाल आणि ओरिसा या पूर्वेकडील राज्यात करतील. त्यांच्या अनुसार आजघडीला बंगालमध्ये भाजपला किमान 30 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. गेल्या लोकसभेत तिला 18 जागा मिळाल्या होत्या. तद्वताच नवीन परिस्थितीत ओरिसामध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलगू राष्ट्र समितीला लागलेली गळती भाजपला अनुकूल आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाबरोबरील समझोता देखील भाजपला फायदेशीर ठरेल.

भाजप जास्तीतजास्त 150 ते 160 जागा मिळवेल असे भाकीत राहुल गांधींनी केलेले आहे तर काँग्रेसच्या झोळीत 50-55 जागा देखील पडणार नाहीत असा मोदींचा दावा आहे. एकमेकाला बाद ठरवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. नेहरूंना शिव्या देणे सोपे आहे पण त्यांच्याप्रमाणे तिसरी टर्म मिळवणे अवघड आहे असा शालजोडीतला विरोधक मारत आहेत.

काळ बदलला आहे. वेळ बदलली आहे. ती कोणाचा कसा सूड घेणार ते मात्र केवळ 4 जूनला मतदानाच्या पेट्या खुलल्यावर कळणार आहे. जूनचा  पहिला आठवडा होत्याचे नव्हते करणार का ते लवकरच दिसणार आहे. भाजपाला 2004च्या भुताने सतावले आहे तर विरोधकांना दहा वर्षाचा वनवास असह्य झाला आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article