युक्रेनला ‘पॅट्रियट’ पुरविणार : अध्यक्ष ट्रम्प
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला पॅट्रियल हवाई सुरक्षा प्रणाली पुरविणार असल्याचे जाहीर करत रशियावर नवे निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या युक्रेन युद्धाविषयीच्या भूमिकेवरून ट्रम्प यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. पुतीन हे दिवसा मधूर बोलतात आणि रात्री युक्रेनवर बॉम्बवर्षाव घडवून आणतात, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
युक्रेनला आम्ही पॅट्रियट हवाई सुरक्षा प्रणाली पुरविणार आहोत. युक्रेनला याची अत्यंत आवश्यकता आहे. शस्त्रास्त्रांची संख्या अद्याप ठरविलेली नाही. परंतु युक्रेनला सुरक्षेसाठी काही प्रणाली अवश्य मिळतील असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
युक्रेनला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखण्याच्या व्हाइट हाउसच्या घोषणेला ट्रम्प यांनी पलटले आहे. तर आता नव्या योजनेनुसार युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांचा खर्च नाटो उचलणार आहे.युक्रेनला अनेक प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रs पाठविणार आहोत आणि याकरता आम्हाला 100 टक्के रक्कम मिळणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी पॅट्रियट सिस्टीम आणि क्षेपणास्त्रांसाठी ‘बहुस्तरीय करारा’च्या समीप असल्याचे उद्गार काढले.
पुतीन यांच्याबद्दल नाराजी
पुतीन हे गोड बोलतात आणि रात्री बॉम्ब वर्षाव करतात असा नाराजीचा सूर ट्रम्प यांनी काढला. तर जानेवारी महिन्यात अध्यक्षपद सांभाळल्यावर ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासोबत मिळून युक्रेन युद्ध संपुष्टात आणणार असल्याचा दावा केला होता, परंतु रशियाने अमेरिका आणि युक्रेनचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे ट्रम्प यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प हे नाटो महासचिव मार्क रट्टे यांना भेटणार आहेत. तर अमेरिकेच्या खासदारांनी नव्या विधेयकाचा प्रस्ताव मांडला असून त्याद्वारे रशियाच्या विरोधात कठोर निर्बंध लादण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
रशियाला धडा शिकविण्याची तयारी
हे विधेयक रशियाची अर्थव्यवस्था आणि रशियाला साथ देणाऱ्या देशांना धडा शिकविणारे असल्याचे उद्गार सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी काढले आहेत. ग्राहम यांनी यावेळी चीन आणि भारत यांचा प्रकर्षाने उल्लेख केला आहे. हे विधेयक एकप्रकारे युद्ध संपुष्टात आणणारा हातोडा’ असल्याचा दावा त्यांनी केला.