हिंदूंचे रक्षण करणार : डोनाल्ड ट्रम्प
कमला हॅरिस यांच्याकडून हिंदूंकडे दुर्लक्ष : निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांचे महत्त्वाचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील मतदानाचा दिवस नजीक येत असून अध्यक्षीय पदाच्या उमेदवारांमध्ये वाक्युद्ध तीव्र होत चालले आहे. याचदरम्यान रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांकडे डोळेझाक केल्याप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बांगलादेशात हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांच्या विरोधात झालेल्या हिंसेची ट्रम्प यांनी निंदा केली आहे. तसेच अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यावर हिंदू अमेरिकनांचे रक्षण करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे.
बांगलादेश पूर्णपणे अराजकतेच्या स्थितीत आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि त्यांचे बॉस अध्यक्ष जो बिडेन यांनी जगभरात आणि अमेरिकेत हिंदूंकडे दुर्लक्ष केले आहे. बांगलादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांची मी निंदा करतो. जर मी अध्यक्ष असतो तर हे कधीच घडले नसते. कमला हॅरिस आणि बिडेन यांनी जगभरातील हिंदूंची उपेक्षा केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
पंतप्रधान मोदींचा उल्लेख
माझ्या प्रशासनाच्या अंतर्गत हिंदू अमेरिकनांचा बचाव केला जाणार आहे. तसेच कट्टरवादी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्याला विरोध करण्यात येईल. माझ्या प्रशासनाच्या अंतर्गत आम्ही भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आमच्या महान भागीदारीलाही मजबूत करू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अर्थव्यवस्था बळकट करणार
कमला हॅरिस या अधिक नियम आणि अधिक करांसोबत अमेरिकेच्या छोट्या व्यवसायांना उदध्वस्त करतील. याच्या उलट मी करांमध्ये कपात केली, नियम शिथिल केले, अमेरिकेच्या ऊर्जेला समोर आणले आणि इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थेचा मान मिळवून दिला. आम्ही ही कामगिरी पुन्हा करू आणि पूर्वपेक्षा अधिक समृद्ध अमेरिका निर्माण करू असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा
ट्रम्प यांनी यावेळी हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाशाचा हा सण असत्यावर विजय मिळवून देईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीय-अमेरिकनांनी त्यांचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. कमला हॅरिस यांनी हिंदूंवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप वक्तव्य केलेले नाही असा दावा हिंदूज फॉर अमेरिकाचे संस्थापक आणि अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी केला आहे. दुसरीकडे हिंदू अॅक्शन संस्थेने देखील ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. बांगलादेशात हिंदूंची स्थिती बिकट आहे. ट्रम्प यांनी नैतिक स्पष्टता दाखविल्याचे आम्ही त्यांचे आभारी आहोत असे संस्थेने म्हटले आहे.
हिंदूंना आकर्षित करत आहेत ट्रम्प
कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्याने अमेरिकेत भारतीय वंशीय लोकांचा त्यांना पाठिंबा मिळणे स्वाभाविक आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत हॅरिस यांचा भारतीय वंशीयांमधील प्रभाव कमी होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे समर्थन वाढत आहे. 61 टक्के भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अद्याप कमला हॅरिस यांचे समर्थन करत आहेत. तर ट्रम्प यांना 31 टक्के भारतीय वंशीयांचा पाठिंबा मिळत आहे.