बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही, आर्लेकर, आजगावकर यांना इशारा
प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी घेतली गंभीर दखल
पणजी : पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर या दोघांनाही प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी कडक समज दिली असून अशी बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दोघांनाही दिला आहे. वरील दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात जाहीर टीका करून एकमेकांवर गांजा तथा ड्रग्स विक्री करत असल्याचा आरोप केला. यामुळे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उघड झाला. ज्या कारणास्तव एकमेकांवर आरोप करण्यात आले त्यातून दोन्ही बाजू ड्रग्स व्यवहारात गुंतल्याचे दोघांनी उघड केले.
प्रदेशाध्यक्षांनी दिली तंबी
पक्ष म्हणून काहीतरी जबाबदारी आहे हे लक्षात घ्या आणि कोणतीही बेताल वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणू नका. तसेच सरकारलाही अडचणीत आणू नका, अशी तंबी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाही यांनी दोघांनाही दिली. आपण ज्या पक्षांमध्ये आहोत त्या पक्षावर फार मोठी जबाबदारी आहे आणि आपण देखील त्या जबाबदारीचा एक भाग आहोत, हे लक्षात घेऊन निवेदने करताना दहावेळा विचार करा, असा सल्ला दामू नाईक यांनी दिला. परत अशा तऱ्हेची निवेदने खपवून घेणार नाही, असा इशारा दोन्ही नेत्यांना दिला आहे.