अग्नितांडव : लुथरा बंधू थायलँडला पसार
बर्च क्लबच्या आणखी एका व्यवस्थापकास अटक : लुथरा बंधूंचे आणखी दोन क्लब केले सील : हडफडे ग्रामपंचायतीतील कागदपत्रे जप्त
म्हापसा : हडफडे येथे बर्च नाईट क्लबमध्ये शनिवारी झालेल्या अग्नितांडवप्रकरणी काल सोमवारी आणखी एका व्यवस्थापकास अटक केल्यामुळे अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. मात्र क्लबचे मालक असलेले सौरव व गौरव हे लुथरा बंधू थायलँडमध्ये पसार झाले आहेत. चौकशी समितीने हडफडे ग्रामपंचायतीतील गेल्या दहा वर्षांची कागदपत्रे, नोंदवह्या, आवश्यक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर दहा वर्षांत सरपंच, पंच व पंचायत सचिव होऊन गेले त्यांची नावे, पत्ते गोळा करुन पुढील चौकशी गतिशील केली आहे. त्याचबरोबर बर्चच्या मालकांचे वागातोर व आसगाव येथील क्लब सील करण्यात आले आहेत. बर्च नाईट क्लबला कोणी परवाना दिला? हा क्लब कसा कार्यरत होता? याची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी काल सोमवारी राज्य पोलिस व दक्षता खात्याचे अधिकारी सकाळी हडफडे ग्रामपंचायत कार्यालयात गेले.
तपास अधिकारी पंचायतीत दाखल
तपास अधिकाऱ्यांनी पंचायतीच्या गेल्या 10 वर्षांची विविध प्रकारची कागदपत्रे पडताळून पाहिली. अनेक महत्त्वाच्या नोंदी असणाऱ्या वह्या व अन्य साहित्य तपासून पाहिले. पुढील तपासासाठी त्यांनी कागदपत्रे, वह्या व काही वस्तू सील करुन आपल्या सोबत नेल्या आहेत, अशी माहिती पंचायत कार्यालयातून सूत्रांनी दिली.
दहा वर्षांतील सरपंच,पंचांचे दणाणले धाबे
सुमारे तीन तास दक्षता अधिकारी व पोलिस हडफडे ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून होते. त्यांनी जाताना कागदपत्रे, नोंदवह्या नेल्यामुळे आता पंचायत सदस्य तसेच कर्मचारीवर्गाचे धाबे दणाणले आहेत. दहा वर्षांत कोण कोण सरपंच, उपसरपंच, पंच होते, त्यांची नावे गोळा करुन नेली आहेत.
पंचायत सचिवांचीही होणार कसून चौकशी
गेल्या दहा वर्षांत या पंचायत कार्यालयात कोण कोण पंचायत सदस्य होऊन गेले त्यांची नावे, पत्तेही चौकशी समितीने मिळवून नोंद करुन नेल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांची कसून चौकशी होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
बर्चचे मालक गौरव-सौरव लुथरा बंधू पोहोचले थायलँडमध्ये
बर्च क्लबचे मालक असलेले सौरभ लुथरा आणि त्याचा भाऊ गौरव लुथरा यांच्याविरोधात गोवा पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. गोवा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही भारतातून पळून थायलँडमधील फुकेट शहरात पोहोचले आहेत. ज्या रात्री बर्चमध्ये अग्नितांडव घडले, त्याच पहाटे हे दोघेही भारतातून पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
‘बर्च’च्या मालकाचे अन्य दोन क्लब सील
बर्च नाईट क्लबच्या अग्नितांडवानंतर या क्लबच्याच मालकीच्या वझरांत वागातोर येथील रोमिओ लेन क्लब आणि आसगाव येथील रोमिओ लेन ब्यूटीक रिसॉर्ट मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आला आहे. सुरक्षात्मक उपाय व्यवस्थेची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत सरकारच्या आदेशानुसार काल सोमवारी ही कारवाई करण्यात आली. सरकारी यंत्रणेने सोमवारी दोन्ही ठिकाणी छापे मारुन पडताळणी केल्यानंतर ते दोन्ही क्लब सील केले. बार्देशचे मामलेदार अनंत मळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
तिघा मेहुणींना वाचविण्यासाठी भावोजी धावले अन्...
‘बर्च’ नाईट क्लबमधील अग्नितांडवात गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुटुंबातील भावना जोशी या बचावल्या. भावना जोशी यांच्या तीन बहिणी सरोज जोशी, अनिता जोशी आणि कमला जोशी आणि पती विनोद कुमार यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. भावना व त्यांचे विनोद हे आगीतून बाहेर येण्यात यशस्वी झाले होते, मात्र भावना यांच्या तिन्ही बहिणी आतमध्ये अडकल्याने त्यांच्या मदतीसाठी भावोजी विनोद धावले होते. मात्र भावोजींसह तीन मेहुण्यांचाही दुर्दैवी अंत झाला. भावना यांचे दैव बलवत्तर होते, म्हणून त्या बचावल्या.
‘बॅचलर पार्टी’साठी नाईट क्लबमध्ये आला अन्...
बंगळुरूहून ‘बॅचलर पार्टी’साठी आपल्या मित्रांसह आलेला वरमुलगा इशाक याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या पाच पर्यटकांच्या गटातील इशाकचे लवकरच लग्न होणार होते. मित्रांना गोव्यात ‘बॅचलर पार्टी’ देण्यासाठी तो हडफडे येथील या नाईट क्लबमध्ये आला होता, दुर्दैवाने त्याचा अग्नितांडवात मृत्यू झाला, तर त्याचे पाचही मित्र सुदैवाने बचावले.
अग्नितांडव अपघात नव्हे, 25 जणांचे खून
बर्च क्लबमध्ये अग्नितांडव होऊन 25 जणांचे मृत्यू झाले, ती घटना म्हणजे अपघात नव्हे, तर खून आहे. यामागे कोण आहेत त्यांना अटक करणे गरजेचे असून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. या प्रकरणात जे कोणी गुंतले आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यासाठी सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यायला हवी. गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आपण उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसेन, असा इशारा आमदार मायकल लोबो यांनी काल सोमवारी दिला आहे.
-आमदार मायकल लोबो
तक्रारीनंतरही क्लबविरोधात का झाली नाही कारवाई?
- हडफडे ग्राम पंचायतीने बर्च क्लबला 2023 साली व्यवसाय परवाना दिला होता. पंचायत मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन हा परवाना देण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
- समाजसेवक प्रदीप घाडी आमोणकर, सुनील दिवकर यांनी 20 डिसेंबर 2023 रोजी पंचायतीकडे तक्रार केली होती. सुरेंद्र कुमार खोसलाने बेकायदेशीररित्या दुकाने, रेस्टॉरंट, सहा बांधकामे आणि दोन डिस्को स्टेजचे बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले होते. प्रती मुख्यमंत्री, पर्यावरण व पर्यटनमंत्री, मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पंचायत यांना सादर केल्या होत्या. तरीही कुणाकडून कारवाई झाली नाही.
- तक्रारीनंतर 17 जानेवारी 2024 रोजी पंचायतीने जागेची पाहणी केली होती. पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी खोसला यांना 15 दिवसांत बांधकाम स्वत:हून हटविण्याचे निर्देश दिले होते.
- मीठागराच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी हडफडे नागवे पंचायतीने सुरेंद्र कुमार खोसला याला 20 मे 2024 रोजी अतिक्रमण हटाव नोटीस बजावली होती. याच बांधकामामध्ये ‘बर्च’ नाईट क्लब थाटला गेला होता.
- हडफडे ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात बांधकाम मालकाने पंचायत संचालनालयात धाव घेऊन पंचायतीच्या आदेशाला स्थगिती मिळविली. पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी ही स्थगिती दिली.
- गेल्या काही वर्षांपासून ही स्थगिती तशीच असून सुनावणीच्यावेळी फक्त तारीख पे तारीख देण्यात येत होती. दुसऱ्या बाजूने क्लब मात्र जोरात सुरु होता.
- सुनावणीच्या वेळेला कधी क्लबच्या मालकाचा वकील तर दुसऱ्या तारखेला पंचायतीचा वकील गैरहजर राहत होता.
- शेवटी अग्नितांडव घडलेच. सरकार जागे झाले. पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांना निलंबित केले. हळर्णकर यांनी कारवाई करण्यास जी टाळाटाळ केली ती कोणाच्या सांगण्यावरुन? त्यामागे कोणती राजकीय व्यक्ती होती? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
