For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणालाही सोडणार नाही, तुरुंगात टाकणार

01:21 PM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुणालाही सोडणार नाही  तुरुंगात टाकणार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अग्नितांडवप्रकरणी कठोर भूमिका : बेकायदेशीरपणाला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार

Advertisement

पणजी : हडफडे येथील ‘बर्च’ क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांचा होरपळून तर अन्य सर्वजण गुदमरून मृत्युमुखी पडल्याचे निदान वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचाही गय करणार नाही, तो मग क्लबचा मालक असो किंवा सदर क्लबमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणास पाठिशी घालणारे सरकारी अधिकारी असो, प्रत्येकावर कठोर कारवाई होईल. सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून तुऊंगात टाकण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

राज्याच्या पर्यटन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पोलिस महासंचालक आलोक कुमार आणि मुख्य सचिव कंदवेलू यांची उपस्थिती होती. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे तर क्लबच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसपथक दिल्लीस रवाना झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चौघे दिल्लीचे पर्यटक होते. तर उर्वरित उत्तराखंड, झारखंड आदी राज्यांमधील आणि काहीजण नेपाळ देशातील होते. त्या सर्वांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था सरकार करणार असून त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले. यापूर्वी या दुर्घटनेची माहिती मिळताक्षणीच केंद्र सरकारकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकास दोन लाख ऊपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार ऊपये मदत जाहीर केली आहे. त्यात आता राज्य सरकारही प्रत्येकी 5 लाख ऊपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार ऊपये मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

चारजणांना अटक, क्लब मालकाचा शोध

अग्नितांडवानंतर हडफडेतील रोमीओ लेन पूर्णपणे सील करण्यात आली आली असून क्लबचे मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोडक (49), सरव्यवस्थापक विवेक सिंघ (28), गेट व्यवस्थापक प्रियांशू ठाकूर (32) आणि बार व्यवस्थापक राजवीर सिंघानिया (32) या चौघांना अटक करण्यात आली आहे. क्लबचा मालक सौरव लुथरा आणि गौरव लुथरा यांच्यविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीजीपी आलोक कुमार यांनी दिली.

बेकायदेशीर क्लबांची मालमत्ता करणार जप्त

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घटनेस जबाबदार प्रत्येकाला यापुढे कठोर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या क्लबांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येईल, तसेच त्यांच्यासाठी विविध परवान्यांचे मुल्यांकन (एसओपी) प्रणाली जारी करण्यात येईल,  असे सांगितले.

नाईट क्लबांच्या ऑडिटसाठी समिती स्थापन

राज्यातील सर्व नाईट क्लबचे ऑडिट करण्यासाठी महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून त्यात दक्षिण गोवा न्यायदंडाधिकारी, अग्निशमन आणि फॉरेन्सिक खात्यांचे संचालक यांचा समावेश करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विद्युत फटाक्यांमुळे लागली आग

हे अग्नितांडव घडण्यामागील कारण काय? असे विचारले असता, प्राथमिक तपासानुसार क्लबमध्ये पेटविण्यात आलेल्या विद्युत फटाक्यांमुळे आग लागल्याचे समजले असल्याचे ते म्हणाले. घटनेनंतर कोणत्याही प्रकारचा स्फोट झालेला नाही. आतील बाजूने लाकडी भाग असल्याने आग वेगाने पसरली मात्र बाहेर पडण्यासाठी केवळ दोनच दरवाजे होते, त्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर पडण्यास मार्गच मिळाला नाही. त्यामुळे 25 पैकी 23 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काही लोक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर

हडफडेतील अग्नितांडवांची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती शोक व्यक्त केला आहे. आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोललो असून योग्य मदतकार्य करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख ऊपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे.

तीन अधिकारी निलंबित

हडफडे येथे ‘बर्च’ क्लबमध्ये तब्बल 25 जणांचे बळी घेणाऱ्या अग्नितांडवास जबाबदार धरून तिघाजणांना तत्काळ निलंबित करण्यात आले. सदर तीन सरकारी अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन पंचायत संचालक तथा अतिरिक्त पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोन्तेरो आणि हडफडे नागवे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांचा समावेश आहे. सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कोणालाच सोडणार नाही, प्रसंगी तुरुंगात टाकणार असल्याचे सांगितले होते, त्यानंतर सायंकाळीच वरील तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अग्नितांडवात बळी गेलेले 25 जण

मोहित (झारखंड), प्रदिप महतो (झारखंड), बिनोत महतो (झारखंड), राहूल तांती (आसाम), सतीश सिंग (उत्तराखंड), मनोजीत माल (आसाम),  चुर्णबहादूर पुन (नेपाळ), सुरेंद्र सिंग (उत्तराखंड), सुभाष चेत्री (दार्जीलिंग) जितेंद्र सिंग (उत्तराखंड), सुमित नेगी (उत्तराखंड), मनिश सिंग (नेपाळ), विवेक कटवाल (नेपाळ), साबिन (नेपाळ), सुनिल कुमार (उत्तर प्रदेश), दिगंबर पतीर आसाम, रोहन सिंग (उत्तर प्रदेश), डॉम्निक (महाराष्ट्र), मनोज जोरा (महाराष्ट्र), सुदीप (नेपाळ) इशाक (कर्नाटक), सरोज जोशी (दिल्ली), विनोद कुमार (दिल्ली), अनिता जोशी (दिल्ली), कमला जोशी (दिल्ली) यांचा यांचे अग्नितांडवात बळी गेले आहेत. यातील पहिले विसजण क्लबचे कर्मचारी असून उर्वरीत पर्यटक होते. 17 मृतदेहांची गोमेकॉत चिकित्सा करण्यात आली असून पाच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.