मेरशीत एक कोटीची दारू जप्त
गोव्यातून जात होती कर्नाटकात : गुन्हा शाखेने केली कारवाई
पणजी : गुन्हा शाखेने केलेल्या कारवाईत एक कोटीची बनावट दारू जप्त केली आहे. बनावट दारू घेऊन गोव्यातून कर्नाटकात जाणारा ट्रक मेरशी बायपास येथे अडवून तपास केला असता बनावट दारूच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125, 274, 318(4), 335, 336(2), 336(3), 340(2), तसेच गोवा दमण दिव अबकारी ड्युटी कायदा कलम 30(अ) आणि (ब) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव हुसेनसाब मुल्ला (35 बिजापूर कर्नाटका) असे आहे.
ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. बनावट दारू भरलेला ट्रक गोव्यातून कर्नाटकात जात असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती त्यानुसार मेरशी बायपास येथे तो ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता, ट्रकमध्ये 1 हजार 498 बॉक्स, 25 किलो वजनाची 35 बॅग एक मोबाईल, मिळून एक कोटीची दारु जप्त केली आहे. ही कारवाई निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक, कॉन्स्टेबल नवीन पालयेकर, दत्तात्रेय वसंत शेट वेर्णेकर, नितीन गावस, श्रीकृष्णा मटकर, आदर्श गवस, कल्पेश विष्णू शिरेडकर आणि होमगार्ड नितीन खोत यांनी केली असून उपअधीक्षक राजेश कुमार आणि अधीक्षक राहूल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुऊ आहे.