गोव्यात अणुउर्जा वीजप्रकल्प उभारणार नाही : मुख्यमंत्री
पणजी : गोवा हे छोटे राज्य असल्यामुळे आम्ही आण्विक वीज उत्पादन केंद्र कधीही स्थापन करणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. केंद्रीय उर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोव्यात अणुउर्जा वीज प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिल्यापासून याविषयी विरोधकांकडून टीका होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की केंद्रीय वीजमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सध्याच्या वीज पुरवठ्याबाबत आणि अतिरिक्त विजेसाठी काही पर्याय सुचवले आहेत. त्यामध्ये आण्विक वीज प्रकल्पाचा समावेश होता, परंतु गोव्याची भौगोलिक स्थिती पाहता आणि राज्य छोटे असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रकल्प गोव्यात कधीही होऊ शकणार नाही. राज्य सरकार तशी परवानगी देणार नाही, मात्र सौर ऊर्जेचा प्रकल्प आमच्यासाठी खुला आहे. आम्ही या अगोदरच अशा प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. गोव्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प एक चांगला पर्याय आहे, असे निवेदन करून मुख्यमंत्र्यांनी आण्विक वीज प्रकल्पाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.