लुथरा बंधूंना न्यायालयाने नाकारले संरक्षण
आरोपींची गोवा न्यायालयात हजर राहण्याची तयारी : वकिलांमार्फत गाठले दिल्लीतील रोहिणी न्यायालय
पणजी : दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने फरार झालेल्या सौरभ आणि गौरव लुथरा या बंधूना हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगप्रकरणी अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा आणि तन्वीर अहमद मीर यांच्या प्रतिनिधित्वाखाली याचिका सादर करुन त्यांनी भारतात परतण्यासाठी आणि गोव्यातील सक्षम न्यायालयामध्ये जाण्यासाठी अटकेपासून संरक्षण मागितले होते, पण न्यायालयाने काल बुधवारी त्यास नकार दिला असून पुढील सुनावणी आज गुऊवारी सुऊ राहणार आहे. शनिवार 6 डिसेंबर रोजी हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गोवा पोलिसा त्यांच्या शोधात असून त्यासाठी इंटरपोलचीही मदत घेण्यात येत आहे.
अपस्मार, रक्तदाबाचा त्रासाचा दावा
लुथरा बंधूंचे वकील दिल्लीतील रोहिणी जिल्हा न्यायालयात लुथरांना ट्रान्झिट अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी पोहोचले. सुनावणीदरम्यान, बचाव पक्षाने वैद्यकीय कारणांचा हवाला देऊन गौरव लुथरा यांना अपस्मार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचा दावा करण्यात आला. लुथरा बंधू फक्त परवानाधारक आहेत, मालक नाहीत असे सांगून अंतरिम दिलासा मागितला.
क्लबच्या व्यवस्थापनाचे खापर फोडले कर्मचाऱ्यांवर
सध्या थायलँडमध्ये असलेले आणि इंटरपोल ‘ब्लू कॉर्नर’ नोटिशीच्या घेऱ्यात असलेले लुथरा बंधू बर्च क्लबच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करत नाहीत असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. अर्जदार आणि त्यांचे सह-भागीदार दिल्लीहून काम करतात आणि क्लबच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करत नाहीत. व्यवस्थापन तेथील कर्मचारी आणि रेस्टॉरंट व्यवस्थापकांद्वारे केले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
देशात परत येण्यास तयार, पण...
त्यांच्या वकिलांनी सांगितले की लुथरा बंधू देशात परत येण्यासाठी आणि कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय गोव्यातील न्यायालयात जाण्यासाठी मदत मागत आहेत. दुर्घटनेत जीव गेले हे दुर्दैवी आहे, परंतु अशिलांचा होणारा छळ आणि सूडबुद्धीने लक्ष्य करणे ही आपली प्राथमिक चिंता असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
दिलासा देण्यास गोवा सरकारचा विरोध
राज्य सरकारने कोणत्याही अंतरिम दिलासा देण्यास विरोध करताना म्हटले, की ते देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी करण्यात आला आहे.
गोवा सरकारचे आज उत्तर
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्ते त्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य वकिलांनी गोवा न्यायालयाने आधीच जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) चा हवाला देत अंतरिम दिलासा देण्यास विरोध केला आणि सविस्तर स्थिती अहवाल आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. न्यायालयाने राज्याला आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश देताना गुऊवारी पुढील सुनावणी ठेवली.
बुलडोझर कारवाई केलेली मालमत्ता बेकायदेशीर
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बर्च क्लबला आग लागून 25 लोकांचे बळी जाण्याच्या घटनेनंतर काही तासांतच आरोपी थायलँडला पळून गेला. तथापि, सौरभ लुथरा यांनी असा दावा केला की 6 डिसेंबर रोजीचा त्यांचा प्रवास हा प्रामाणिक व्यावसायिक कारणांसाठी होता. सौरभ लुथरा व्यावसायिक उपक्रम आणि संभाव्य रेस्टॉरंट उपक्रमांशी संबंधित व्यावसायिक बैठकांसाठी परदेशात गेला होता, असे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी उत्तर सादर केले. पोलिसांनी सांगितले की जी मालमत्ता पाडण्यात आली ती बेकायदेशीरपणे बांधलेली आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करणारी असल्याचे मानले जाऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्देशांनुसार त्यावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.