Sangali Protest News : सरसकट कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही : संजयकाका पाटील
शेतकऱ्यावर अस्मानी संकट आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला
तासगाव : अतिवृष्टीने बागायत, जिरायत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यावर अस्मानी संकट आले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जमुक्ती सरकारची जबाबदारी आहे.
बळीराजाच्या, जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज आज क्षीण झाला आहे, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी होणे आवश्यक असून ही संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय व सात बारा कोरा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
तर तासगावातील विराट चक्काजाम आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, सरसकट कर्जमाफी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगांवातील एस टी स्टॅन्ड चौकात मंगळवारी विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
प्रभाकरबाबा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संजयकाका म्हणाले, शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, विरोधकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे. आपणही तसे करावे. पण नौटंकी करणे आपल्या रक्तात नाही.
ज्यांनी मला राजकारणात शक्ती दिली आहे ती घाबरून बसण्यासाठी दिली नाही तर लढण्यासाठी दिली आहे. अतिवृष्टीने कडधान्यासह द्राक्ष, ऊस, शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जे शेतकऱ्यांशी प्रतारणा करतील त्यांना देवही माफ करणार नाही. मतदारसंघात विविध पाणी योजना मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला वेठीस धरण्याचा, त्रास देण्याचा हेतू नाही, असे काकांनी स्पष्ट केले.
संजयकाका म्हणाले, शेतकऱ्यांच्या नरड्याला हात लावाल तर हा संजय पाटील गप्प बसणार नाही. पुढचा राजकीय जीवनाचा आधार समजून मी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून लढा देईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, शेतकऱ्यांच्या आड कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसणार नाही आमदार, खासदार सर्वस्व नाही. मला शेतकरी महत्वाचा आहे, असे ही काकांनी स्पष्ट केले.
प्रभाकरबाबा पाटील म्हणाले, अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आला आहे म्हणून तो इथे आला आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, बोगस बियाणे व औषधे पुरवणाऱ्या टोळीचा बंदोबस्त झाला पाहिजे, द्राक्ष बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा. प्रमोद शेंडगे, शशिकांत जमदाडे, हर्षवर्धन जाधव यांची भाषणे झाली. आंदोलनात बाबासाहेब पाटील, अनिल कुत्ते, जाफर मुजावर, किशोर गायकवाड, अॅड. अविनाश शिंदे, आर.डी. पाटील, महेश्वर हिंगमिरे, नितीन पाटील, विनोद आदी सहभागी झाले धोत्रे, होते.