रशियाला 1 इंच जमीन देणार नाही!
डोनाल्ड ट्रम्प- ब्लादिमीर पुतीन बैठकीपूर्वी युक्रेनच्या अध्यक्षांची घोषणा : शांतता करार होण्याची शक्यता कमी
वृत्तसंस्था/कीव्ह
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान 15 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीद्वारे अमेरिका युक्रेनमधील युद्ध रोखू इच्छित आहे, परंतु त्यापूर्वीच युक्रेनच्या अध्यक्षांनी कुठल्याही स्वरुपात रशियासोबत भूमीची अदलाबदली होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी डोनबासमध्ये युक्रेनच्या नियंत्रणाखालील क्षेत्रांमधून स्वत:च्या सैनिकांना परत बोलाविण्यास नकार दिला आहे. रशियासोबत संभाव्य भूमी अदलाबदली करारात सामील होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. डोनबास हा युक्रेनचाच हिस्सा असून त्यातील मोठ्या हिस्स्यावर आता रशियाने नियंत्रण मिळविले आहे तर एका हिस्स्यावर अद्याप युक्रेनचे नियंत्रण आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे पूर्ण डोनबासवर कब्जा करू इच्छित आहे, कारण हा भूभाग रणनीतिच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
वाटाघाटीस नकार
आम्ही डोनबास सोडणार नाही, आम्ही असे करू शकत नाही. आमच्या क्षेत्रांवर अवैध स्वरुपात कब्जा झाल्याचा मुख्य मुद्दा प्रत्येक जण विसरू पाहत आहे. डोनबासमध्ये रशियाला भूमी दिल्यास त्याला पुढील काही वर्षांमध्ये एक नवे युद्ध सुरू करणे आणि युक्रेनमध्ये आणखी खोलवर घुसण्याची संधी मिळणार आहे. याचमुळे रशियासोबत कुठल्याही प्रकारच्या जमिनीच्या अदलाबदलीच्या कराराची शक्यता आम्ही फेटाळत आहोत, असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. यामुळे अलास्का येथे ट्रम्प-पुतीन यांच्यात होणाऱ्या बैठकीतून तोडगा निघण्याची अपेक्षा खूपच कमी झाली आहे.
युक्रेनच्या सुरक्षेची हमी
कुठल्याही भूभागाबद्दल चर्चा सुरक्षा हमीशिवाय होऊ शकत नाही, असे झेलेंस्की यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात झेलेंस्की हे अमेरिका आणि युरोपकडून युक्रेनच्या सुरक्षेची हमी इच्छित आहेत, सध्या सुरू असलेले युद्ध संपुष्टात आल्यावर पुढील काळात रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला करू नये आणि रशियाने हल्ला केल्यास अमेरिका आणि युरोपने सुरक्षेसाठी पुढे यावे, अशी हमी झेलेंस्की यांना हवी आहे. जर सध्या आम्ही सुमारे 9 हजार चौरस किलोमीटर म्हणजेच डोनेट्स्क क्षेत्राचा 30 टक्के हिस्सा रशियाला दिला, तर त्याच्यासाठी ही नव्या आक्रमकतेसाठी लाँचपॅड ठरेल असे वक्तव्य झेलेंस्की यांनी केले आहे.
ट्रम्प यांची ऑफर नाकारली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांतता करारासाठी जमिनीची अदलाबदली आधार ठरेल अशाप्रकारचे वक्तव्य वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर झेलेंस्की यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर कब्जा केला आहे. आम्ही युक्रेनला त्या क्षेत्राचा काही हिस्सा परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रशियाचा अनेक क्षेत्रांवर कब्जा
लुगांस्क (एलपीआर) आणि डोनेट्स्क (डीपीआर) पीपल्स रिपब्लिक, जापेरज्जिया आणि खेरसॉन क्षेत्रांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न रशियाने सातत्याने केला आहे. 2022 मध्ये रशियाने या भागांमध्ये कथित स्वरुपात जनमत चाचणी करविली होती आणि त्याच्या आधारावर या क्षेत्रांना रशियन हिस्सा घोषित केले होते. चालू वर्षाच्या प्रारंभी एलपीआरवर रशियाच्या सैन्याने पूर्णपणे कब्जा केला होता, परंतु अन्य क्षेत्रांवर रशियाचे नियंत्रण अद्याप 100 टक्के झालेले नाही. युक्रेन चारही क्षेत्रांसोबत क्रीमियासंबंधी पूर्णपणे निर्णय इच्छित आहे. रशियाने क्रीमियावर 2014 मध्ये कब्जा केला होता, परंतु झेलेंस्की यांनी यापूर्वीही रशियाला कुठल्याही प्रकारची क्षेत्रीय सवलत देणार नसल्याचे म्हटले आहे. तर कुठल्याही शांतता कराराकरता युक्रेनला स्वत:च्या ‘नव्या सामील क्षेत्रां’मधून मागे हटावे लागेल, अशी रशियाची भूमिका आहे. यामुळे ट्रम्प-पुतीन यांच्यात होणारी चर्चा यशस्वी ठरण्याची शक्यता मावळू लागली आहे.