अणुबाँबच्या धमक्यांना घाबरणार नाही
पाकिस्तानचे असीम मुनीर यांना भारताचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तानचे ‘फील्ड मार्शल’ असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन भारताला दिलेल्या अणुबाँबच्या धमकीचा यस्थास्थित समाचार भारताने घेतला आहे. पाकिस्तानच्या अणुधमक्यांना आम्ही घाबरत नसून आमच्या अधिकारात जे आहे, ते आम्ही करुच असे स्पष्ट प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र विभागाने दिले आहे. असीम मुनीर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी तेथील एका जाहीर कार्यक्रमात भारताला धमकी दिली होती. भारताने सिंधू जलकराराच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळणारे पाणी तोडल्यास भारताला धडा शिकविला जाईल. भारतावर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची पाकिस्तानची क्षमता आहे. सिंधू नदीवर भारताने धरण बांधून पाणी आडविल्यास पाकिस्ताची 10 क्षेपणास्त्रे हे धरण तोडण्यासाठी सज्ज आहेत, अशी धमकी त्यांनी या कार्यक्रमात भारताच्या विरोधात दिली होती.
भारताचे चोख प्रत्युत्तर
अमेरिकेत जाऊन मुनीर यांनी दिलेली धमकी आमच्या कानावर आली आहे. अणुबाँबची धमकी देऊन भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणे, हा पाकिस्तानचा धंदा आहे. तथापि, आम्ही त्याला भीक घालत नाही. पाकिस्तानने मित्रदेशात जाऊन ही धमकी दिली असली, तरी आमच्या कृतींवर या धमकीचा कोणताही परिणाम होणार नाही, हे पाकिस्तानने समजून घ्यावे. पाकिस्तानला आम्ही नुकताच मोठा दणका दिला आहे. त्यावेळीही पाकिस्तानने अशीच धमकी दिली होती. पण तिचे काय झाले हे सर्वांना माहिती आहे, अशा अर्थाचे प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्त रणधीर जयस्वाल यांनी दिले आहे.
पाकिस्तान बेजबाबदार देश
पाकिस्तान एक बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. तो दहशतवादाचा पाठीराखा असून अनेक दहशतवादी संघटनांना त्याने पोसले आहे. पाकिस्तानचे प्रशासन आणि लष्कर दहशतवाद्यांच्या तालावर नाचते, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण कोणाकडे आहे, यासंबंधीचा संशय मुनीर यांच्या विधानामुळे अधिक गडद झाला आहे. मुनीर यांनी ही बेजबाबदार विधाने मित्रदेशाच्या भूमीवरुन त्यांनी अशी धमकी देणे, हे अधिकच गंभीर आहे, असेही रणधीर जयस्वाल यांनी भारताच्या वतीने आपल्या प्रत्युत्तरात स्पष्ट केले आहे.
सुरक्षेसाठी योग्य ते करतच राहणार
आपल्या सीमा आणि आपले नागरीक यांच्या सुरक्षितेसाठी भारत जे आवश्यक आहे, ते करतच राहणार आहे, असे जयस्वाल यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे. आमच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही. अशा दबावाला आम्ही शरण जाणार नाही, असेही जयस्वाल यांनी प्रत्युत्तरात स्पष्ट केले आहे.