महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दक्षिणेच्या जागेसाठी ‘नारी सन्मान’ भाजपची गॅरंटी ठरणार काय?

06:04 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 195 उमेदवारांची यादी भाजपने नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये गोव्यातील दोनपैकी उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला. उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना पुन्हा एकदा ही उमेदवारी मिळाल्याने ते सहाव्यांदा रिंगणात उतरतील. यापूर्वी सलग पाचवेळा उत्तर गोव्यातून विजयी झालेले श्रीपादभाऊ हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर विद्यमान मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ केंद्रात मंत्री राहिलेले गोव्यातील भाजप नेते आहेत.

Advertisement

 

Advertisement

लोकसभा निवडणुकीत सलग पाचवेळा विजयी होण्याचा विक्रम यापूर्वी काँग्रेसचे खासदार एदुआर्द फालेरो यांच्या नावावर आहे. सन 1977 ते 1991 या कार्यकाळात दक्षिण गोव्यातून ते खासदार होते. उत्तर गोव्यातून अशी विक्रमी कामगिरी भाजपतर्फे श्रीपाद नाईक यांनी नोंदविली आहे. आतापर्यंत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेल्या श्रीपादभाऊ यांना यंदा उमेदवारी मिळविताना त्यांच्याच पक्षातील काही उमेदवारांशी स्पर्धा करावी लागली. अखेर हे आव्हान पेलण्यास ते यशस्वी ठरले तरी त्यांची खरी कसोटी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात लागणार आहे. काँग्रेस-आप युतीचा उमेदवार हा भाजपसमोरील मुख्य प्रतिस्पर्धी असून त्यांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व इतर एक-दोन नावे सध्या चर्चेत आहेत. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे गोव्यात दाखल झाले असून त्यांनी संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी स्थानिक नेत्यांशी चर्चाही सुरू केली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतून जाहीर होणाऱ्या यादीत गोव्यातील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत राज्यात भाजप, काँग्रेस व ‘आप’ने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स सोडल्यास अन्य प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत केवळ युती व पाठिंब्याचे धनी राहिले असल्याने त्यांच्या गोटात फारसा उत्साह दिसत नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबत खरी उत्सुकता ताणली आहे, ती दक्षिण गोव्यातून. दक्षिणेतील उमेदवारावर भाजपाचे घोडे अडलेले असताना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अचानकपणे त्याला कलाटणी देत, नवीनच रणनीती आखली गेली आहे. माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ही नावे संभाव्य उमेदवार म्हणून अंतिम टप्प्यात पोहोचलेली असताना, भाजपने धक्का तंत्राचा वापर करीत दक्षिणेतून महिला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही त्याला जाहीर पुष्टी दिल्याने सध्या भाजपमधील महिला नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व राज्य महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष असलेल्या सुलक्षणा सावंत, प्रखर हिंदुत्ववादी शेफाली वैद्य यांच्यासह बरीच नावे सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. काही महिलांच्या उमेदवारीचा पक्षातर्फे विचार चालला असून काहींनी स्वच्छेने आपली नावे जाहीर केली आहेत. जिंकण्याची क्षमता या निकषावर संभाव्य महिला उमेदवारांची यादी तयार झाली असून त्यापैकी एक नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिल्याने भाजपची तयारी कुठवर पोहोचली आहे, हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आशिष सुद हे गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांचा हा गोवा दौरा म्हणज ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमासाठी आहे, असे सांगितले जात असले तरी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही!

दक्षिण गोव्यातील भाजपच्या या रणनीतीमुळे विरोधी पक्षालाही आपल्या रणनीतीवर फेरविचार करावा लागेल. गोवा दौऱ्यावर असलेल्या माणिकराव ठाकरे यांच्या बैठकीत कदाचित हा विचार होणे क्रमप्राप्त आहे. शिवाय काँग्रेस व मित्रपक्षांतील काही महिला उमेदवारांची महत्त्वाकांक्षा जागृत होऊन त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरल्यास पक्षापुढे पेच निर्माण होऊ शकतो.

मोदी सरकारने महिलांना राजकीय आरक्षणाचा संसदीय मार्ग मोकळा केला असून दक्षिण गोव्यातून त्याची नांदी झाल्यास त्याचे स्वागतच करावे लागेल. महिन्याभरापूर्वी पंतप्रधान मोदी यांची सभा दक्षिण गोव्यात झाली होती. आजपर्यंत जे मतदारसंघ भाजपच्या खात्यात जमा झालेले नाहीत, त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील भाजपचा अजेंडा आहे. भाजपच्या हातून कायम निसटणारा दक्षिण गोवा, हा त्यापैकी एक आहे. भाजपची एकंदरीत तयारी पाहता एखादी जागा जिंकायची झाल्यास उमेदवार हा त्यांच्यासाठी प्रातिनिधीक असतो. या अर्थाने पाहिल्यास ‘महिला सन्मान ही मोदी गॅरेंटी’ सिद्ध करण्यासाठी दक्षिणेत भाजपची ही वेगळी रणनीती दिसते.

गोव्यातील आजवरच्या राजकीय इतिहासात काही मोजक्याच महिला नेत्यांनी स्वबळावर आपले कर्तृत्त्व ठळकपणे सिद्ध केले आहे पण हे महिला नेतृत्त्व विधानसभेपर्यंत तळपले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर, माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस, संगीता परब, निर्मला सावंत अशी ही मोजकीच यादी आहे. मागील विधानसभा निवडणुकीतून अजून तीन महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या पण त्यामागे कौटुंबिक राजकीय बळ व पुऊषी महत्त्वाकांक्षा अधिक दिसते. लोकसभा निवडणूक जिंकून गोव्याचे प्रतिनिधीत्त्व केलेल्या माजी खासदार संयोगिता राणे सरदेसाई या एकमेव अपवाद आहेत. 1980 साली मगो पक्षातर्फे त्या उत्तर गोव्यातून खासदार बनल्या होत्या. त्यानंतर राज्यातील नारीशक्ती ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतपर्यंत सीमित राहिली. ज्या आमदार बनल्या, त्या भक्कम कौटुंबिक राजकीय पाठबळाच्या जोरावर. भाजपकडे आज महिला कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही नारी आपली शक्ती पणाला लावते. काँग्रेसला घराणेशाहीची दुषणे देत, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पोहोचविण्याची प्रथा भाजपानेच सुरू केली.

आज इतर पक्षातून आमदार आयात धोरणामुळे ती कितपत शिल्लक आहे, हे निष्ठावान कार्यकर्तेच सांगू शकतील. तूर्त दक्षिणेच्या जागेत महिला उमेदवाराचा विचार, हाच खरा मुद्दा आहे. यापूर्वी काही महिला उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढविली आहे. एकतर त्या स्वतंत्र उमेदवार होत्या किंवा त्यांचा पक्ष सत्तेत नव्हता. सत्ताधारी भाजपकडून गोव्यात नारी शक्तीला ही संधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. तो कितपत साध्य होईल, हे उद्याच्या महिलादिनीच स्पष्ट होणार आहे.

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article