For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी विरोधकांना बेसावध पकडणार काय?

06:02 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी विरोधकांना बेसावध पकडणार काय
Advertisement

या महिन्याच्या शेवटापर्यंत लोकसभा निवडणूकीची अचानक घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांची दाणादाण उडवू शकतात अशी चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे. गेल्या महिन्यातच नितीश कुमार यांना इंडिया आघाडीपासून तोडून त्यांनी विरोधकांना एक जबर झटका दिला होता. या महिन्यात ते ममता बॅनर्जीना तोडण्याचा प्रयत्न करणार व त्यानंतर निवडणुकीचा बार उडवून देऊन विरोधकांचे कात्रज करणार असे बोलले जात आहे. जर वेळेप्रमाणे एप्रिल-मे मध्ये निवडणूक होणार असेल तर मार्चच्या मध्याला  तिची घोषणा व्हायला हवी.भाजपच्या बरोबर युती करण्यासाठी आपल्यावर दबाव येत आहे आणि तपास संस्थांचे शुक्लकाष्ठ जोरदारपणे आपल्या मागे लावण्यात आले आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला.

Advertisement

झारखंडमध्ये नवीन सरकारने जोमाने सिद्ध केलेले बहुमत आणि चंदीगड महापौर निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यावर उडवलेले तुफान ताशेरे भाजपला अंतर्मुख करायला लावतील का हे लवकरच दिसेल. चंदीगडचे प्रशासक असलेले पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी तडकाफडकी राजीनामा का बरे दिला याबाबत बरीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गृहमंत्री अमित शहा यांची राजधानीत भेट घेऊन राज्यपाल नुकतेच परतले होते.  भाजपने निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरु केली आहे. आता मार्चमध्ये निवडणुकीची घोषणा होणार अशा भ्रमात असणाऱ्या विरोधकांना ती महिनाभर अगोदरच करून बेसावध पकडले तर भेदरलेली इंडिया आघाडी अजूनच चुका करून बिनबोभाटपणे तिसऱ्यांदा सत्ता संपादन करायला आपल्याला साहाय्य करेल असे मोदींचे गणित दिसत आहे. ढेपाळलेल्या विरोधकांसमोर मोदी-शहा हे उडत्या पाखराचे पंख मोजणारे आहेत. पण याचा अर्थ विरोधक हातपाय गाळून निपचित पडले आहेत असा मात्र खचितच नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उसळत असलेली गर्दी भाजपच्या अभ्यासाचा विषय बनलेली आहे. तर काँग्रेसच्या मित्र पक्षांत त्यामुळे वेगळीच चिंता वाढत आहे.

Advertisement

राष्ट्रपती अभिभाषणावरील संसदेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी परत एकदा काँग्रेसवर तोंडसुख घेतले. याचा अर्थ निवडणूक जवळ आलेली असताना देखील मोदींना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी काँग्रेसच दिसत आहे अशी शशी थरूर यांनी केलेली मल्लिनाथी फारशी चुकीची नाही. काँग्रेसला अचानक बाळसे येईल का? ही भीती राज्यकर्त्यांमध्ये वारंवार दिसून येते.  हेमंत सोरेन यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली आणि झारखंडचा  मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देणे भाग पाडण्यात आले त्याने भाजप आदिवासी समाजाच्या कशी विरुद्ध आहे हा  संदेश देण्यात हेमंत यशस्वी ठरल्याने सत्ताधाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. चंपाई सोरेन या एका तळमळीच्या आदिवासी नेत्याला आपला उत्तराधिकारी बनवून हेमंत यांनी संकटाचे संधीत रूपांतर केले आहे असे बोलले जाते.

पंतप्रधानांनी ओडिशाचा नुकताच दौरा करून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला पण तेथील मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांचा बिजू जनता दल या पक्षाविरुद्ध ते अवाक्षर ही बोलले नाहीत. पंचवीस वर्षांपूर्वी ओडिशात सत्तेत असलेल्या काँग्रेसवर त्यांनी आगपाखड केली. विरोधी इंडिया आघाडीपासून फटकळपणे दूर राहून नवीन यांनी राष्ट्रीय स्तरावर आपण मोदींबरोबर आहोत असा संदेश अगोदरच दिलेला आहे. भाजपबरोबर जायचे की नाही या पेचात अडकलेले आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी अयोध्येला प्राणप्रतिष्ठा समारंभाला हजेरी लावून आपण मोदी विरोधी नाही असा संदेश दिलेला आहे. ते लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करतील असे मानले जाते. त्यांना राज्याचा मुख्यमंत्री बनायचे आहे त्याला सोयीस्कर राजकारण ते पुढील काळात करणार आहेत. कालपर्यंत अखिलेश यादव यांच्याबरोबर आहेत असे मानले गेलेले राष्ट्रीय लोक दलाचे  जयंत चौधरी यांनी अचानक टोपी फिरवून आता भाजपबरोबर घरोबा केलेला आहे. त्यांचे आजोबा चरण सिंग यांना भारतरत्न घोषित करून मोदींनी त्यांचा मार्ग सुकर केलेला आहे. अचानक ज्या घाऊक पद्धतीने नरसिंह राव, एम एस स्वामिनाथन, चरण सिंग यांना कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने या थोर व्यक्तींविषयी सत्ताधाऱ्यांना फार आदर असण्यापेक्षा त्यांचा निवडणुकीत वापर करण्याचा हा प्रकार आहे अशी एक भावना वाढीस लागत आहे. ईडी आणि तमाम तपास संस्थांची विरोधकांमध्ये एव्हढी भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे की ते ताक देखील फुंकून पीत आहेत. बाहेर फारसा गाजावाजा न करता जेव्हढे काम चुपचाप केले, सत्ताधाऱ्यांची नजर चुकवून केले तर त्याचा जास्त फायदा होणार हे न कळायला ते दुधखुळे नाहीत.   मांजर सावध झाले तर ते उंदरांचा फडशा पाडते हे ते जाणतात.

येणारा फड आपण मारल्यात जमा आहे असा जबर आत्मविश्वास भाजपमध्ये दिसत आहे. माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कालखंडात फार मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, असे पंतप्रधानांनी संसदेत सांगून हिंदुत्व मतपेढीला ‘योग्य‘ तो संदेश दिलेला आहे. जर मोदींमध्ये तिसऱ्या टर्मबाबत चलबिचल असती त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात लोकांना खुश करण्याच्या बऱ्याच योजना जाहीर करायला लावल्या असत्या. ‘ब्रँड मोदी‘ इतका मोठा आहे आणि त्यापुढे विरोधक म्हणजे कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भटाची तट्टाणी असेच चित्र राज्यकर्त्यांना दिसत आहे. त्यामुळे ‘अब कि बार, 400 पार‘ चा नारा दिला गेलेला आहे.  तो कितपत गाठता येईल अथवा कसे हे येणारा काळ दाखवेल. संपूर्ण दक्षिण भारत तसेच बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तीन राज्ये भाजपकरिता आव्हानात्मक राहू शकतात. भाजप अजेय आहे असे ढोल देशभर वाजवले जात असले तरी केवळ हिंदी प्रदेशांत ते खरे आहे तर विंध्याच्या पलीकडे मात्र यात काडीइतके सत्य नाही, असे मार्मिकपणे एका राजकीय निरीक्षकाने नोंद केले आहे. याचा अर्थ प्रचाराच्या बाबतीत भाजपच्या पासंगाला पुरेल असा विरोधी पक्ष अजून जन्मायचा  आहे.

केवळ पंतप्रधानांना सोडून उत्तरप्रदेशात भाजप साऱ्या खासदारांचे  यंदा तिकीट कापणार आहे अशा प्रकारचे एक गमतीशीर भाष्य समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी समाज माध्यमांवर केले. त्यांचा असा दावा कि उत्तर प्रदेशात खासदारांची मोठ्या प्रमाणावर तिकिटे कापल्याशिवाय भाजपला जिंकणे कठीण आहे. समाजवादी पक्षाने आपले दहा-बारा उमेदवारांची नावे जाहीर करून एकीकडे काँग्रेसला धक्का दिला आहे तर दुसरीकडे भाजपला सावध केले आहे. अयोध्यमधील वाजत गाजत केलेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर बरेच नवनवीन मुद्दे पुढे आल्याने राम लहरींचा प्रभाव कमी होत आहे असे चित्र निर्माण झाल्याने भाजप जमेल तसे नवीन साथीदार जोडत चालला आहे.

विरोधी पक्षांनी आर्थिक प्रश्नांवर सरकारचे वाभाडे काढणे वाढवले असतानाच मनमोहन सिंग सरकारच्या काळातील आर्थिक कारभाराबाबत श्वेतपत्रिका आणून भाजपने एक डाव खेळला आहे खरा पण तो कितपत यशस्वी ठरला आहे याबाबत शंका आहे. सध्याच्या लोकसभेचे सूप वाजले आहे. आता ‘चलो गाव कि और‘ चा नारा आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.