For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी राजभाषा होणार ही काळ्या दगडावरची रेघ!

01:33 PM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
मराठी राजभाषा होणार ही काळ्या दगडावरची रेघ
Advertisement

राज्यनिमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांचा विश्वास : मंगेशी येथील बैठकीस 300 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

Advertisement

पणजी : मराठी राजभाषा केल्याशिवाय या सरकारकडे अन्य पर्याय राहणार नाही, असे वातावरण गोव्यातील समस्त संस्कृतीप्रेमी व मराठीप्रेमी जनतेत, सामूहिक ताकदीच्या आधारावर आपण निर्माण करणार आहोत. सांस्कृतिक गोव्याच्या आकांक्षांचा हा निर्धार आहे. मराठी राजभाषा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा आत्मविश्वास मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्यनिमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी व्यक्त केला आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकवजा कार्यशाळेत 300 पेक्षा जास्त, तुडुंब भरलेल्या सभागृहातील उपस्थितीनिशी, मंगेशी येथील वागळे हायस्कूल प्राकारात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मोठ्या उत्साहाने ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, केंद्रीय कार्यकारी मंडळ सदस्य गोविंद देव, मराठी-मातृशक्ती राज्यप्रमुख डॉ. प्रा. अनीता तिळवे, मराठी-युवाशक्ती राज्यप्रमुख विनायक च्यारी, युवा संरक्षक नितीन फळदेसाई व राष्ट्रीय मातृशक्ती संरक्षक गावडे हे उपस्थित होते.

गणेशचतुर्थीच्या धामधुमीत मध्यंतरी आंदोलन मोहिमेतील सर्वसामान्यांमध्ये आलेली मरगळ घालवून आंदोलनाची गती, व्याप्ती व धग वाढवण्यासाठी तसेच नजीकच्या काळातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सदर व्यापक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळा वजा बैठकीत प्रखंड कार्यकर्ते, मातृशक्ती आणि युवाशक्ती अशा तीन गटांचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले. या तीन स्वतंत्र सत्रांचे संचालन अनुक्रमे प्राचार्य सुभाष वेलिंगकर, डॉ. प्रा. अनीता तिळवे व विनायक च्यारी यांनी हाताळले. त्यांना संतोष धारगळकर, प्रणव बाणावलीकर, श्री गावडे, मच्छिंद्र च्यारी व नितीन फळदेसाई यांनी सहाय्य केले. प्रथम सत्रात 18 वर्गात 18 प्रखंडांच्या बैठका घेण्यात आल्यानंतर मातृशक्ती गट व युवाशक्ती गटांच्या स्वतंत्र नियोजन बैठका झाल्या. शेवटच्या सामूहिक एकत्रित समारोप सत्रात संबंधित कार्यकर्त्यांची ठरवलेल्या योजनेबद्दल निवेदने झाली. एकूण 18 प्रखंडांचे प्रतिनिधी व युवाशक्ती व मातृशक्ती प्रमुखांची निवेदने झाली.

Advertisement

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये बैठकांचा धडाका

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायती व नगरपालिकांतील प्रभाग स्तरापर्यंत बैठका व समितीस्थापना मोहीम पूर्ण करण्यात येईल, असे ठरले. मातृशक्ती यंत्रणेतर्फे गोवाभर ऑक्टोबर अखेरपर्यंत 18 प्रखंडांमध्ये 180 प्रयत्न बैठका ठरल्या असून युवाशक्तीने नोव्हेंबर अखेरपर्यंत 230 प्रयत्न बैठका घेण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या सगळ्या प्रयत्न बैठकांचे पर्यावसान गोवाभर मातृशक्ती आणि युवाशक्तीचे प्रत्येकी 20/20 मेळावे स्वतंत्ररित्या घेण्याचे ठरले आहे. गायक नितीन ढवळीकर यांनी ‘जयजयकार करतो आम्ही मायमराठीचा’ हे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी खास रचलेले गीत सांघिक म्हणायला लावून कार्यशाळेची सुऊवात झाली.

गेल्या साडेपाच महिन्यात मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे पार पाडलेल्या उपक्रमांचे पडद्यावर दृकश्राव्य सादरीकरण केंद्रीय कार्यकारी समितीचे प्रा. आत्माराम गावकर यांनी प्रभावीपणे केले. एकूण कार्यशाळेचे गतिविधी व संबंधित सूचना निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी सांगितल्या. शेवटी मार्गदर्शक गो.रा.ढवळीकर यांनी समारोप केला. आपण स्वीकारलेली कार्यपद्धती सुयोग्य असून, मराठी राजभाषा होणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण सगळे मिळून एकजुटीने हा तेजस्वी इतिहास घडविण्यास सज्ज होऊया!, असे आवाहन ढवळीकर यांनी केले. संतोष धारगळकर यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. केंद्रीय कार्यकारी मंडळाचे श्रीराम पालकर, प्रविण नेसवणकर, रामदास सावईवेरेकर, घन:श्याम कुंकळकर यांनी व्यवस्था सांभाळल्या. सामूहिक पसायदानाने कार्यशाळेची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.