हडफडे सचिवासह, उपसरपंच, पंचसदस्यांची हणजूण पोलिसांकडून चौकशी
लपाछपी करणारे माजी सचिव अखेर चौकशीला सामोरे; बर्च नाईट क्लब अग्नितांडव प्रकरण
प्रतिनिधी/ म्हापसा
बर्च नाईट क्लब अग्नितांडवात 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी हडफडे पंचायतीच्या उपसरपंच सुषमा श्रीकृष्ण नागवेकर, स्टेफी फर्नांडिस व पंचायतसदस्य विनंती राजेश मोरजकर तसेच गटविकास अधिकारी व माजी पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना समन्स देऊन चौकशीसाठी पोलिसांनी हणजूण पोलिसस्थानकात बोलावून घेतले. या सर्वांची सुमारे चार तास चौकशी करून त्यांना घरी पाठविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून लपाछपी करणारा आणि अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेले माजी सचिव रघुवीर बागकर यांनीही शनिवारी अखेर हणजूण पोलिस स्थानकात हजेरी लावली व चौकशीला सामोरे गेले. निलंबित अधिकारी श्रीमती हळर्णकर, मोंतेरो यांची जबानी पोलिसांनी नोंद केली होती मात्र माजी पंचायत सचिव बागकर यांनी चौकशीला सामोरे जाण्यास नकार देत लपाछपी करीत होते. यामुळे माजी सचिव बागकर चौकशीला सामोरे न आल्यास त्याला रितसर अटक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. शनिवारी हणजूण पोलिसांनी या सर्वांची जबानी नोंद करून घेतली आहे. दरम्यान, याबाबत उपसरपंच सुषमा नागवेकर व स्टेफी फर्नांडिस म्हणाल्या की, आम्ही पोलिसांना सहकार्य केले असून जी काही माहिती त्यांना हवी ती आम्ही पुरविली आहे. याबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले.
हडफडे पंचायतीमधून महत्त्वाच्या फाईल्स जप्त
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी व वरिष्ठ अधिकारीवर्गांनी हडफडे पंचायतीमध्ये जाऊन तेथील दस्ताऐवज व महत्त्वाच्या सर्व कागदपत्रांची चौकशी केली असून पंचायतीमधून महत्त्वाच्या फाईल्स कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे आता बर्च नाईट क्लबला परवाना देण्यासाठी अन्य कोण कोण गुंतलेले आहेत त्यांचे धाबे दणाणले असून त्या सर्वांची चौकशी होणार आहे. किनारी भागात व बर्च क्लबकडून कोण-कोण हप्ते घेत होते त्यांची माहिती येथील व्यवस्थापक मंडळ तसेच इतर क्लबधारकांनी आपल्या जबानीत चौकशी समितीला दिल्याचे वृत्त आहे.