लक्ष्मण घेणार गंभीरची जागा?
टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभागी : अजित आगरकरनेही घेतला आढावा
वृत्तसंस्था/ लंडन
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतले आहेत. गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे गंभीरला भारतात परतावे लागले. दुसरीकडे, गंभीर इंग्लंडला परत कधी टीम इंडियामध्ये सामील होईल हे अद्याप माहित नाही. यामुळे लक्ष्मण हे भारतीय संघाला या सामन्यासाठी मार्गदर्शन करतील. त्यामुळे आता काही दिवस लक्ष्मण यांच्याकडे भारताच्या हेड कोच पदाची धुरा राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरची आई आयसीयूमध्ये आहे, ज्यामुळे गंभीर सध्या भारतात आहे. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आणि इंडिया अ संघात आंतर-संघ सामने खेळत आहेत. याच वेळी, बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे सीईओ आणि माजी भारतीय दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण काही काळासाठी टीम इंडियामध्ये गौतम गंभीरची कमान सांभाळू शकतात. लक्ष्मण आधीच लंडनमध्ये आहे आणि तो टीम इंडियाच्या सरावावर लक्ष ठेवून आहे. लक्ष्मण व्यतिरिक्त टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील टीम इंडियाच्या सरावावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, उभय संघातील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून खेळवला जाणार आहे. गंभीर इंग्लंडमध्ये जाईपर्यंत लक्ष्मण हे संघाची हेड कोच म्हणून धुरा सांभाळतील, हे हंगामी हेड कोच पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. याशिवाय, सितांशू कोटक हे फलंदाजी प्रशिक्षक तर मॉर्ने मॉर्कल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पहिल्या कसोटीत लक्ष्मणला सपोर्ट करतील.
अजित आगरकरने घेतला सरावाचा आढावा
लक्ष्मण आधीच लंडनला पोहोचला आहे आणि तो टीम इंडियाच्या सराव सामन्यावर लक्ष ठेवताना दिसला. यावेळी केवळ लक्ष्मणच नाही तर निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. लक्ष्मण वरिष्ठ टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 2-3 वर्षांत त्यांनी काही निवडक मालिकांमध्ये टीम इंडियाची जबाबदारी सांभाळली आहे. सीओईचे प्रमुख म्हणून, जेव्हा जेव्हा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड किंवा सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर उपलब्ध नव्हते, तेव्हा लक्ष्मणने ही जबाबदारी स्वीकारली आहे.