चौथ्या कसोटीत कुलदीप यादवला संधी मिळेल ?
मायकेल अॅथरटन, अजिंक्य रहाणेंकडून पर्याय विचारात घेण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल अॅथरटनने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीसाठी भारताकडून केल्या जाऊ शकणाऱ्या बदलांवर भाष्य करताना इंग्लंडविरुद्ध तीन फिरकी गोलंदाज उतरविण्याचा सल्ला दिला आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतल्याने भारतासमोर पुनरागमनाचे आव्हान उभे राहिले आहे.
भारत त्यादृष्टीने आपला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उपयोग करून घेण्याचा आणि सर्वोत्तम संघरचनेचा विचार करत असताना डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपले कौशल्य दाखवण्याची आणि त्याची जादू विणण्याची वेळ आली आहे, असे मत अॅथरटनने व्यक्त केले आहे. ओल्ड ट्रॅफर्डने नेहमी मनगटी फिरकीला पसंती दिली आहे हे लक्षात घेता 57 वर्षीय अॅथरटनने भारताला दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांना वापरण्याचा सल्ला दिला आहे. जरी फिरकी मारा भारताच्या हातून प्रभावी कामगिरी घडवू शकत असला, तरी मँचेस्टरमधील हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता आहे. यामुळे त्यांना संघ निवडीच्या बाबतीत पुनर्विचार करावा लागू शकतो.
‘टीव्हीवर पाहता खेळपट्टी पाटा दिसते. पण ओल्ड ट्रॅफर्डमध्ये मनगटी फिरकी चांगली चालते, म्हणून मला वाटते की ते बुमराह आणि सिराज आणि त्यांच्या जोडीला तीन फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, जडेजा आणि कुलदीप यांच्या रूपाने खेळवू शकतात. पण मँचेस्टरमधील हवामानाच्या अंदाजाबद्दल तुम्हाला माहिती नाही, ती वेगळी गोष्ट आहे. जर ते थंड राहील आणि अधिक पाऊस पडणार असेल, तर वेगवान गोलंदाजांची भूमिका नंतर महत्त्वपूर्ण होईल का हे विचारात घ्यावे लागेल. पण मला वाटते की, भारताने हा एक निश्चित पर्याय विचारात घ्यावा’, असे अॅथरटनने स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टवर सांगितले.
एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीत आणल्यानंतर, भारताचा कर्णधार शुभमन गिलने असे म्हटले होते की, कुलदीपचा वापर करण्याचा पर्याय हा आकर्षक असला, तरी फलंदाजीची खोली वाढवण्यास त्याचे प्राधान्य होते. भारताने नंतर तीच संघरचना कायम ठेवताना प्रसिद्ध कृष्णाची जागा बुमराहने घेतली आणि शेवटी इंग्लंडच्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात त्यांना अपयश आले, ज्यामुळे यजमानांना 1-2 अशी आघाडी मिळाली.
भारत विजयासाठी उत्सुक असताना माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने देखील कुलदीपसाठी संघात जागा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. जर मँचेस्टरची खेळपट्टी मागील काळातील खेळपट्ट्यांसारखी असेल आणि गेल्या तीन सामन्यांसारखी असेल तर त्याने खेळावे. फलंदाजीच्या बाबतीत सगळे काही ठीक आहे, पण तुम्हाला असे खेळाडू हवे आहेत जे तुम्हाला बळी मिळवून देऊ शकतील. बदल्यात 25-30 धावा कमी केल्या तरी ते ठीक आहे. परंतु बळी घेण्यासाठी कोणी तरी हवे आहे. कारण तुम्ही नेहमीच वेगवान गोलंदाजांवर अवलंबून राहू शकत नाही, असे रहाणेने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे.