हजारे करंडक स्पर्धेत कोहली खेळणार?
वृत्तसंस्था / बेंगळूर
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अनुभवी आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्पर्धेतील बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सर्व सामन्यांत तो खेळणार असल्याचे समजते. कोहलीचे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनरागमन होणार आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे व्यंकटेश प्रसादने घेतल्यानंतर या संघटनेच्या कार्याच्या गतीला आता चांगलाच वेग आला आहे. चालु वर्षीच्या प्रारंभी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल विजेत्या आरसीबी संघाच्या स्वागतासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर या स्टेडियमवर सामन्यांवर बंदी घालण्यात आली होती. पुन्हा या स्टेडियममध्ये अशा दुर्घटना होवू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय घेतले जातील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी बेळगावात सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा सामने भरविण्यास आम्हाला परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान राज्याच्या गृहमंत्र्यांनी केएससीएचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगितले. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने न खेळविण्याचा आमचा हेतु नाही. पण गर्दी संदर्भात आम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी बीसीसीआयकडून योग्य ती पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले.