भारत - दक्षिण आफ्रिका तिसरी टी-20 लढत आज
शुभमन गिलला स्थान वाचविण्याच्या दृष्टीने पुढील तीन सामन्यांत निर्णायक संधी, सूर्यकुमार यादवच्या फॉर्मविषयीही प्रश्न
वृत्तसंस्था/ धर्मशाला
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज रविवारी येथे होणार असून अडचणीत सापडलेल्या शुभमन गिलसाठी संघातील आपले स्थान वाचवण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. सहा आठवड्यांत सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन ’प्लॅन बी’कडे वळण्याआधी त्याला आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविऊद्धचे आणखी तीन सामने मिळण्याची शक्यता आहे.बर्फाच्छादित पर्वतरांगेच्या कुशीत, 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात भारत रविवारी प्रोटियाजविऊद्ध तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना भारतीय ड्रेसिंग रूममध्ये अचानक वातावरण तापले आहे. कारण कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दीर्घकाळापासूनच्या खराब फॉर्ममुळे प्रश्न निर्माण झाला आहे. याहून वाईट म्हणजे त्याचा उपकर्णधार शुभमन गिल, ज्याला चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे, तो फारसा आत्मविश्वास निर्माण करत नाही.
एनरिक नॉर्टजे, मार्को जॅनसेन, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन आणि लुथो सिपामला यांचा समावेश असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी विभागाने भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी कशी करावी हे दाखवून दिले आहे आणि एचपीसीए स्टेडियमची खेळपट्टी, जी अतिरिक्त उसळी आणि थोडा स्विंग देते, ती निश्चितपणे त्यांना आकर्षित करेल. सर्व टी-20 संघांचा विचार करता दक्षिण आफ्रिकेकडे यावेळी भारतीय उपखंडात चषक जिंकण्याच्या दृष्टीने आवश्यक संतुलन असल्याचे दिसते. क्विंटन डी कॉकचे पुनरागमन तसेच एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डोनोव्हन फेरेरा, डेव्हिड मिलर आणि अष्टपैलू जॅनसेन यांच्या उपस्थितीमुळे त्यांची फलंदाजी खूपच प्रभावी दिसते.
तिसऱ्या टी-20 सामन्यापासून टी-20 विश्वचषक विजेतेपद राखून ठेवण्याच्या मोहिमेला सुऊवात होण्यापूर्वी केवळ आठ सामने शिल्लक असताना भारताचे टीकेचे लक्ष्य ठरलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघात खराब फॉर्ममधील अव्वल फळीतील दोन फलंदाजांना स्थान देण्याचा धोका पत्करू शकणार नाहीत. संघाचा कर्णधार असल्याने गेल्या एका वर्षापासून पूर्णपणे फॉर्ममध्ये नसतानाही सूर्याला टी-20 विश्वचषकात निश्चितपणे सूट मिळेल, परंतु गिलबद्दल असे म्हणता येणार नाही. सलामीवीर म्हणून त्याला मूळ पसंती मिळाली नव्हती. गिलचा टी-20 संघात प्रवेश हा ’जे काही बिघडलेले नाही ते दुऊस्त करण्याच्या प्रयत्नाचा एक उत्तम नमुना आहे आणि आतापर्यंत गोष्टी चांगल्या दिसलेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने इंग्लंडविऊद्धच्या एका खराब मालिकेमुळे सॅमसनला बाजूला सारण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता हे सिद्ध करण्यासाठी गिलला आपल्या क्षमतेपेक्षाही सरस कामगिरी करावी लागेल. या शैलीदार भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधाराला आपला टी-20 खेळ शोधावा लागेल आणि जर त्याला सॅमसनला त्याचे योग्य स्थान परत मिळू द्यायचे नसेल किंवा 165 चा शानदार टी-20 आंतरराष्ट्रीय स्ट्राइक रेट असलेल्या यशस्वी जैस्वालला न्यूझीलंड मालिकेदरम्यान संघात स्थान मिळू द्यायचे नसेल, तर त्याला पुढील तीनपैकी किमान दोन सामन्यांमध्ये धावा कराव्या लागतील.
मुख्य प्रशिक्षक गंभीर ही इतकी गर्विष्ठ व्यक्ती आहे की, ते मान्य करणार नाहीत, पण दुसऱ्या टी20 सामन्यात अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे ही रणनीतीच्या दृष्टीनें एक चूक होती. अक्षरला बढती देऊन जी चूक करण्यात आली ती तिसऱ्या सामन्यात पुन्हा होण्याची शक्यता नाही. तिथे कर्णधार तिसऱ्या क्रमांकावर परत येईल अशी अपेक्षा आहे, जिथे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुऊवातीच्या काही वर्षांत खूप यश मिळालेले आहे. त्याचप्रमाणे फलंदाजीच्या क्रमातील बदलामुळे शिवम दुबेला आठव्या क्रमांकावर पाठवणे हा आणखी एक खराब निर्णय होता. यामध्ये पुढील सामन्यांत सुधारणा करण्याची आवश्यकता असेल.
कुलदीप यादव हा एक असा गोलंदाज आहे ज्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सातत्याने अडचणीत आणले आहे. परंतु भारतीय संघात आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज उपलब्ध राहील याची काळजी घेण्याच्या धोरणामुळे या डावखुऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजाला अनेकदा वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. धर्मशालामध्येही त्याला बाहेर बसावे लागू शकते, कारण कुलदीप आणि वऊण चक्रवर्ती हे दोन फलंदाजी न करणारे खेळाडू एकाच टी-20 संघात असू शकत नाहीत. कारण त्यामुळे फलंदाजीच्या खोलीशी तडजोड होईल. अर्शदीपसाठी आतापर्यंतची मालिका चांगली गेलेली नसताना हार्दिक पंड्याला जसप्रीत बुमराहसोबत नवीन चेंडूवर मारा करायला लावून संघ व्यवस्थापन कुलदीपसाठी जागा निर्माण करेल का हे पाहावे लागेल.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वऊण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, हर्षित राणा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, जॉर्ज लिनडे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.