भारताचा 6.5 टक्के जीडीपी राहणार?
नवी दिल्ली :
जागतिक बँकेने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लादण्यात आलेल्या शुल्काचा परिणाम लक्षात घेत दक्षिण आशियातील आर्थिक विकासाचा अंदाज घटविला आहे. दक्षिण आशियाचा विकास दर 2026 मध्ये 5.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज बँकेने वर्तविला असून याच दरम्यान भारताचा विकास दर 6.5 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. तथापि भारताच्या विकासदराच्या अंदाजात बँकेने वाढ केली आहे.
भारताच्या बाबतीत जागतिक बँकेने यापूर्वी आपला अंदाज 6.3 टक्के इतका वर्तविला होता. सध्याच्या भारताच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन नव्याने जीडीपी दर 6.5 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने भारतावर 75 टक्केपेक्षा जास्त निर्यातीवर 50 टक्क्यांपेक्षा अधिक शुल्क आकारणी सुरू केली आहे. यामुळे टेक्स्टाईल, ज्वेलरी या सारख्या क्षेत्रांवर मोठा परिणाम दिसतो आहे.
रिझर्व्ह बँकेने भारताचा जीडीपी दर 6.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तविला आहे. व्यापार शुल्क व कमकुवत निर्यात याचा दबाव भारताच्या विकासावर काही प्रमाणात दिसू शकतो. दुसरीकडे देशातील मागणीमुळे विकासाला आधार मिळू शकतो, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.
व्यापार शुल्काचा मोठा परिणाम
दक्षिण आशियाची अर्थव्यवस्था 2026 मध्ये 5.8 टक्के दराने विकसित होणार आहे. 2025 मध्ये अर्थव्यवस्था 6.6 टक्के राहिली होती. ही घसरण गेल्या 25 वर्षांमध्ये सर्वात मोठी मानली जाते.