वीजवाहिन्यांच्या धोक्यापासून हेस्कॉम सावध होणार का?
नंदिहळ्ळी शिवारात खांब कलंडले : उच्चदाबाच्या वाहिन्यांमुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली
बेळगाव : नंदिहळ्ळी गावच्या शिवारात विद्युत खांब कलंडल्याने वीजवाहिन्यांची उंची कमी झाली आहे. यामुळे ऊस, गवत याची वाहतूक करताना धोका निर्माण झाला आहे. उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची मशागत तसेच इतर कामे करावी लागत आहेत. अनेकवेळा बागेवाडी येथील हेस्कॉम कार्यालयाला कळवूनदेखील विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यात आली नाही. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून, दुरुस्ती न झाल्यास गांधीनगर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. प़ृषी विद्युत पुरवठ्यासाठी वडगाव येथील उपकेंद्रांतून नंदिहळ्ळी शिवारापर्यंत उच्च दाबाची वाहिनी 40 वर्षांपूर्वी घालण्यात आली. वडगाव, अवचारहट्टी, यरमाळमार्गे नंदिहळ्ळी शिवारापर्यंत विद्युत वाहिनी घालण्यात आली आहे. परंतु नंदिहळ्ळी शिवारातील बेकिनकेरे ट्रॉन्स्फॉर्मरजवळ विद्युत खांब एका बाजूला कलंडले आहेत. कलंडलेले विद्युत खांब केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. तसेच विद्युत खांब कलंडल्याने विद्युत वाहिन्या जमिनीलगत लोंबळकत आहेत.
हेस्कॉमच्या गांधीनगर कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
सध्या 9 ते 10 फुटांवर उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्या लोंबळकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वर्षभरापूर्वी बेळगुंदी येथे विद्युत वाहिन्या तुटून अंगावर पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी ओढावू नये यासाठी शेतकरी जीव मुठीत घेवून शेती करत आहेत. वर्षभरापूर्वी बागेवाडी येथील हेस्कॉम कार्यालयात शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती. परंतु थातूरमातूर कारणे देत पुढील वर्षी दुरुस्तीचे काम करू, असे उत्तर देण्यात आले होते. परंतु अद्यापही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे लवकरच हेस्कॉमच्या गांधीनगर कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
विद्युतवाहिन्या कोसळण्याची भीती
विद्युत खांब एका बाजुला कलंडल्याने वाहिन्या जमिनी लगत आल्या आहेत. शेतामधून गवत तसेच उसाची वाहतूक करताना अडचणी येत आहेत. वादळी वारा व जोरदार पावसाच्या दिवसांत विद्युत वाहिन्या कोसळण्याची भीती असते. यामुळे शेतकरी जीव मुठीत घेवून शेती करत आहेत. हेस्कॉमकडे रितसर तक्रार करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- गजानन लोंढे-शेतकरी