गृहलक्ष्मीचा निधी मिळणार का?
काहींना जुलैच्या निधीचा लाभ, ऑगस्ट-सप्टेंबरचे काय?
बेळगाव : महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखली जाणारी गृहलक्ष्मी योजना विस्कळीत होऊ लागली आहे. तब्बल तीन महिन्यांचा निधी रखडला आहे. यामध्ये काही लाभार्थ्यांना जुलैचा निधी मिळाला असला तरी अद्यापही ऑगस्ट आणि सप्टेंबरपासून लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑगस्ट-सप्टेंबरचा निधी मिळणार का? हेच आता पहावे लागणार आहे. सत्तेतील सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये गृहलक्ष्मी योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला 2 हजार रुपये दरमहा दिले जातात. मात्र, मागील दोन-चार महिन्यांपासून ही योजना विस्कळीत होऊ लागली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी एकाचवेळी दोन महिन्यांचा निधी जमा करण्यात आला होता. त्यानंतर ही योजना डळमळीत झाली आहे. शिवाय सर्वसामान्य लाभार्थ्यांतून या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय गृहलक्ष्मी योजना बंद पडल्याची दबक्या आवाजात चर्चाही होऊ लागली आहे. दरम्यान, सत्ताधारी सरकारमधील मंत्र्यांकडून मात्र गॅरंटी योजना आणि गृहलक्ष्मी सुरळीत सुरू राहील, असे आश्वासन कायम दिले जात आहे. प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थी बँकेच्या पायऱ्या झिजवतानाही दिसत आहेत. येत्या काळात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा निधी मिळणार का? याची चिंताही लाभार्थ्यांना लागली आहे.