छत्तीस तासांमध्ये डिस्क्लेमर देणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘घड्याळ’ या चिन्हाचा उपयोग केला जात आहे. मात्र, या चिन्हासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे स्पष्टीकरण (डिस्क्लेमर) येत्या 36 तासांमध्ये सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये ठळकरित्या प्रसिद्ध केले जाईल, असे प्रतिपादन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात केले आहे.
असे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्याचा तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार त्यांचे वकीन बलबीरसिंग यांनी न्यायालयात अंडरटेकिंग दिले आहे. असे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वीच अजित पवार यांना दिला होता. मात्र, तशा प्रकारे कृती होत नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाने या संबंधी एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी बुधवारी करण्यात आली. या सुनावणीच्या प्रसंगी अजित पवार यांच्यावतीने हे अंडरटेकिंग देण्यात आले आहे. न्यायालयाने आजवर जे आदेश दिले आहेत, त्यांचे तंतोतंत पालन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात आहे. त्यात कोणतीही कमतरता नाही, असे बलबीरसिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
शरद पवार गटाचा आक्षेप
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही. स्पष्टीकरण न देण्यात आलेले घड्याळ चिन्हाचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आले असून ते लोकांपर्यंत पोहचले आहेत. आता न्यायालयाने काही कारवाई करु नये, या हेतूने हे व्हिडीओ पुसून टाकण्यात येत असून हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे, असा युक्तीवाद शरद पवार गटाचे वकील प्रांजल अग्रवाल यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने तोंडी आदेश दिला.