राममंदिराला विनामूल्य जाण्याची संधी देणार
वृत्तसंस्था / हैद्राबाद
तेलंगणा राज्यात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील जनतेला विनामूल्य अयोध्या यात्रा घडवून भव्य राममंदिराचे दर्शन घडविले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी दिले आहे. तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी हे आश्वासन दिले.
काँग्रेसने राम मंदिराचे निर्माण कार्य 70 वर्षे प्रलंबित ठेवले. आपल्या मतपेढीवर परिणाम होऊ नये म्हणून तो पक्ष रामभक्तांच्या भावना पायदळी तुडवत राहिला. तथापि, अखेर जनतेच्या भावनांचाच विजय झाला आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सत्ता स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आता भव्य राममंदिराचे निर्माणकार्य रामजन्मूभीच्या स्थानी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 75 वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर क्रांतीकारक निर्णय देऊन राम मंदिराचा मार्ग प्रशस्त केला. त्यामुळे भारतासह जगभरातील सर्व रामभक्तांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता, येत्या 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना या मंदिरात होत आहे. तेलंगणातील जनतेला ही सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी गडवाल येथील जनसभेत शनिवारी केले.
मागासवर्गिय मुख्यमंत्री देऊ
राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यास राज्याला प्रथम मागासवर्गिय समाजातील मुख्यमंत्री देण्यात येईल, या आपल्या पक्षाच्या आश्वासनाचा पुनरुच्चार शहा यांनी केला. मागासवर्गियांना न्याय देण्याचे कार्य केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात, असेही प्रतिपादन त्यांनी केले.