45 दिवसात सनद मिळणार
लवकरच काढणार वटहुकूम, मंत्रिमंडळाचा निर्णय : खनिज ट्रकांना 2027 पर्यंत रस्ता करात सूट,ट्रकमालकांना 15 ते 50 हजारांचा दिलासा,सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा,पशुचिकित्सा महाविद्यालयात 185 पदभरती
पणजी : राज्यात नागरिकांना जमिनीची सनद (मालकी हक्क प्रमाणपत्र) मिळविण्यासाठी लागणारा कालावधी विद्यमान 60 वरून 45 दिवसांवर आणण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गुऊवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी नंतर सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली. या बैठकीत अन्य विविध विषयांवरही चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.
खनिज ट्रकांना रस्ता करात सूट
खनिज वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकांना रस्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रकांना यापूर्वीच रस्ता करात सूट देण्यात येत होती. परंतु खाणी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याने अनेक ट्रक आजही विनावापर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मालकांना दिलासा देण्यासाठी विद्यमान योजनेला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रक मालकांना 15 ते 50 हजार ऊपये पर्यंत (प्रती ट्रक) फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सनद मिळणार 45 दिवसांत
सनद मिळवण्याचा कालावधी 45 दिवसांवर आणण्याच्या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी या निर्णयामुळे व्यवसाय सुलभता आणि कामांसाठी याचा फायदा होईल. त्यासाठी 1968 च्या महसूल संहितेत वटहुकूमाद्वारे दुऊस्ती करण्यास मान्यता दिली आहे. नगरनियोजन तसेच वन खात्याच्या काही परवान्यांसंबंधी शिथिलता देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा
अन्य निर्णयांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारी नोकरीत असलेल्या आई-वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यास त्यांच्या अनाथ झालेल्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर त्वरित सरकारी नोकरी देण्यात येईल. त्यासाठी अनुकंपा नियुक्ती योजनेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या योजनेंतर्गत सध्या प्राधान्य यादीत सुमारे 800 अर्ज आहेत, अशी माहिती दिली.
पशुचिकित्सा महाविद्यालयात 185 पदभरती
पशुचिकित्सा महाविद्यालयात 23 वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये 185 पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याशिवाय पशुसंवर्धन खात्यात 2 तंत्रज्ञ व एक प्रयोगशाळा साहाय्यक अशा तीन पदांना मान्यता देण्यात आली आहे. मोपा विकास प्राधिकरणातही काही पदांची निर्मिती केली असून गोमेकॉत 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत खरेदी केलेल्या औषधांसाठी 9.77 कोटी ऊपये मंजूर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पूजाबद्दल पोलिसांनी माहिती दिल्यानंतर बोलणार
पूजा नाईक हिने आरोप केलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाबाबत विचारले असता, त्याबाबत आपण अद्याप पोलिसांकडून माहिती घेतलेली नाही. याप्रकरणी प्रथम पोलिस माहिती देतील आणि नंतर आपण बोलेन, असे ते म्हणाले.
शिरगांव चेंगराचेंगरी प्रकरणी योग्य कारवाई
शिरगाव येथील देवी लईराई जत्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून त्यासंबंधी योग्य कारवाई करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रश्नावर सांगितले. जत्रोत्सवात गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि रस्ते विस्तार योजना लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.