For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारी नाल्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

12:06 PM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारी नाल्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार
Advertisement

शेतकऱ्यांच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय

Advertisement

बेळगाव : बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षीच हजारो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होत आहे. या नाल्याच्या खोदाईसाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र काही कारणाने या नाल्याची जिल्हा प्रशासन खोदाई करत नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. आता लवकरच याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले. वडगाव, वाडा कंपाऊंड येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सोमवारी बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमाकांत बाळेकुंद्री होते. प्रारंभी कीर्तीकुमार कुलकर्णी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करून शेतकऱ्यांना बळ्ळारी नाल्यासंदर्भात मते मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर माजी नगरसेवक मनोहर हलगेकर म्हणाले, बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षीच वडगाव, शहापूर शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नाल्याचा सोक्षमोक्ष लावणे ही काळाची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांची शेतीच नाहीशी होणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये याबाबत आवाज उठविला होता. मात्र तत्कालीन मनपा आयुक्तांनी पाटबंधारे खात्याकडे बोट करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

अमोल देसाई म्हणाले, बळ्ळारी नाल्याची खोदाई करण्यासाठी यापूर्वी झालेले प्रयत्न अपुरे होते. त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. जोपर्यंत आम्ही संघटित होत नाही, तोपर्यंत या नाल्याची खोदाई होणार नाही, असे त्यांनी सांगितले. शेतकरी शिवाजी तारीहाळकर यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या नाल्याची खोदाई न करण्यामागे षड्यंत्र आहे. येथील शेतकऱ्यांनी जमिनी विकून द्याव्यात, असा काहीजणांचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी बैठकीत केला. नारायण सावंत म्हणाले, या नाल्याच्या खोदाईसाठी आम्ही जिल्हाधिकारी, महानगरपालिका, कृषीमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे नेहमीच पाठपुरावा केला आहे.  या नाल्यातील प्रवाह पुढे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेले बॉक्स प्रथम खुले केले पाहिजेत. याचबरोबर हुदलीपर्यंत नाल्याची खोदाई झाल्यास कायमस्वरुपी आम्ही पुरापासून वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी म्हणणे मांडले. पालकमंत्र्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

Advertisement

उद्याही शेतकऱ्यांची बैठक

बुधवारी सकाळी 10.30 वा. पुन्हा शेतकऱ्यांची बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली. याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या भूमिकेनंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.